रोहित पवार, चाकणकर यांच्यासोबत फोटो असलेल्या अमितनेच केली दगडफेक - Photos of Amit Surwase with Rohit Pawar and Rupali chakankar goes viral | Politics Marathi News - Sarkarnama

रोहित पवार, चाकणकर यांच्यासोबत फोटो असलेल्या अमितनेच केली दगडफेक

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 जुलै 2021

गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात दोघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात बुधवारी (ता. ३० जून) सायंकाळी दगडफेक झाली. ही दगडफेक केलेल्या दोघांची ओळख पटली असून त्यापैकी एक असलेला अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समजते. त्याचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photos of Amit Surwase with Rohit Pawar and Rupali chakankar goes viral) 

पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात दोघा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध घेतला जात आहे. गाडीवर दगडफेक केलेल्या तरुणाचे नाव अमित सुरवसे आहे. अमित हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे त्याच्या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट होते. मात्र, त्याच्याकडे पक्षाचे कोणतेही पद नसल्याचेही समजते.  

हेही वाचा : बनावट कोरोना लसीकरणाचे कनेक्शन थेट राज्यपालांपर्यंत

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, रुपाली चाकणकर यांच्यासोबत अमितचे फोटो आहेत. तसेच राष्ट्रवादीचा झेंडा मिरवतानाही त्याचे फोटो आहेत. अमितने धनगर समाजातील विविध प्रश्नांवर त्याने यापूर्वीही आवाज उठवल्याचे समजते. मागीलवर्षी त्याने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनातही सहभाग घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, त्यानं पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक का केली, हे अद्याप समोर आलेले नाही.  

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कौतूक

अमितबद्दल सोशल मीडियावर एक पोस्टही व्हायरल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्यांच्या फेसबूक पेजसह काही राष्ट्रवादीच्या काही ग्रुपवर ही पोस्ट दिसत आहे. अमित हा शरद पवारांवर प्रेम असणारा शेतकरी कुटूंबातील साधा कार्यकर्ता असल्याचं त्यात नमूद केलं आहे. सोलापुरात असणारे कोणते पक्षाचे नेते ना पदाधिकारी याला ओळखतात न जवळ करतात. पण फक्त पक्ष प्रेमापोटी हे पोरगं राष्ट्रवादीचा कोणताही नेता सोलापुरात येऊद्या बुलेटला झेंडा लावून सर्वात पुढे असतंय. ज्या समाजाला भडकावून गोपीचंद पडळकर जातीय द्वेष पसरवत आहेत त्याच समाजातील अमितसारखे शरद पवारांवर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आहेत, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यावरून त्यांच्या भाषेबद्दल नाराजी व्यक्त होत होती. दगडफेकीसंदर्भात बोलताना पडळकर म्हणाले की, पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यात कशा प्रकारे गुंडगिरी चालते, हे राज्याला माहिती आहे. यामध्ये कोणालातरी पुढे केले असेल. माझ्या गाडीवर दगडफेक करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न असेल तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी या विषयात मागे हटणार नाही, असे पडळकर म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख