‘काटक’ जिल्हाधिकारी शर्मा चिखल मातीतला माणूस असल्याचा प्रत्यय..

ओढ्या - ओघळींतून उड्या मारत आणि चिखल तुडवत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नुकसानग्रस्त शेती व पिकांची पाहणी केली.
‘काटक’ जिल्हाधिकारी शर्मा चिखल मातीतला माणूस असल्याचा प्रत्यय..
Beed Collector Inspect News

बीड : मनिपूरी माणूस हा काटक, धाडसी, प्रतिकुल वातावरणात राहणारा असतो हे सर्वश्रुत आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा देखील मनीपुरीच. त्यांच्याकडे पाहताना ‘काटक’पणाचा सहज अंदाज येतो. पण, त्यांच्यातील संवेदनशिलता आणि चिखल - मातीतला माणूस असल्याची चुणूक देखील शनिवारी दिसली. (District Collector inspects damaged areas by treading mud) चिखल तुडवित, नद्या - ओढे आणि शेतांना पडलेल्या भगळींतून उड्या मारुन जात त्यांनी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेती व पिकांची पाहणी केली.

राधाबिनोद शर्मा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आणि अतिवृष्टीला सुरुवात झाली. त्यामुळे सामान्यांसह पत्रकारांना त्यांच्या कार्यशैलीचा व व्यक्तीमत्वाचा फारसा अंदाज आला नाही. ( District Collector Radhabinod Sharma, Beed) मात्र, त्यांनी पंधरवाड्यापूर्वी गेवराई तालुक्यात मध्यरात्री स्वत: जाऊन अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाया केल्या. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी साध्या वाहनातून प्रवास केला. कारवाईचे फोटोसेशन होणार नाही याचीही काळजीही घेतली.

तेव्हाच हे अधिकारी काहीतरी वेगळे असल्याचा अंदाज आला होता. तसेच पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर काही आयएएस अधिकाऱ्यांमध्ये असलेला कथित आविर्भाव, मीपणा व मोघमपणे‘करणारच’असे प्रकार त्यांच्यात नसल्याचे संवादातून स्पष्ट झाले. त्यांची शरिरयष्टी काटक तर दिसतेच, पण, त्यांच्यातला संवेदनशिलपणा व चिखल मातीतला माणूस असल्याची जाणीवही होते.

४ ते ७ सप्टेंबर  या चार दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले. पावसामुळे नद्यांना पुर येऊन पिकांसह जमिनीही वाहून गेल्या. गेवराई तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. अनेक छोटे तलाव फुटल्याने जमिनी वाहून गेल्या. याची पाहणी करण्यासाठी शनिवारी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराई तालुक्यात पाहणी दौरा काढला.

गेवराई तालुक्यातील बगपिपंळगाव, शेकटा, नागझरी, सावळेश्वर, आमला, वाहेगाव आदी गावच्या शिवारांत जाऊन पाहणी केली. मात्र, शेतीवर जाण्यासाठी वाट नाही, त्यामुळे वाहन जाण्याचा प्रश्नच नाही. पण, पायी जायचे म्हटले तर चिखलाबरोबर तलाव फुटल्याने पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांतून उड्या मारत ते शिवारांत पोचले.

शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याबरोबरच त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धीरही दिला. तसा मनिपूरी माणूस काटक व साहसी असतोच. पण, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संवेदनशिलता व कार्यतत्परतेचा प्रत्ययही या निमित्ताने आला.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in