दहीहंडी उत्सव नाहीच! ठाकरे सरकारनं परवानगी नाकारली

राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी संवाद साधला.
CM Uddhav Thackeray denied the permission for Dahihandi
CM Uddhav Thackeray denied the permission for Dahihandi

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ठाकरे सरकारनं यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. समन्वय समितीने साध्या पध्दतीने हा उत्सव साजरा करण्यासाठी मान्यता देण्याची विनंती केली होती. पण सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्सव साजरा न करण्याचे आवाहन गोविंदा पथकांना केलं आहे. (CM Uddhav Thackeray denied the permission for Dahihandi)

राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी संवाद साधला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक,  माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगांवकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दहिहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, गोविंदा पथकाचे सदस्य उपस्थित होते.

समन्वय समितीने उत्सवाला मान्यता देण्याची मागणी केली होती. गोविंदांना कोरोना लशीचे दोन डोस दिले जातील, मानाच्या हंडी फोडण्याची परवानगी, गर्दीवर नियंत्रण ठेवू आदी मुद्दे मांडत समितीने ही परवानगी मागितली होती. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची त्यांची समजूत काढत उत्सवाला परवानगी नाकारली. काही काळासाठी आपले सण, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण जगाला देऊ, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री म्हणाले की, सण, उत्सवाबाबत आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. पण आज नागरिकांचे प्राण वाचवायचे आहेत. त्यामुळे जेंव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे, हा प्रश्न समोर येतो तेंव्हा पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो. दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणुविरूद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत. या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नसतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. डेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे हे सगळे सांगितले जात असताना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही, असे पवार म्हणाले. सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य यापुढेही द्यावे असे आवाहनही पवार यांनी केले. संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल, असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com