हा भालकेंचा नाही, तर अजित पवार यांचा पराभव; बाळा भेगडेंचा हल्लाबोल - this is not the defeat of the bhalke defeat of ajit pawar bala bhengades attacked | Politics Marathi News - Sarkarnama

हा भालकेंचा नाही, तर अजित पवार यांचा पराभव; बाळा भेगडेंचा हल्लाबोल

उत्तम कुटे
रविवार, 2 मे 2021

या निवडणुकीत पाण्याच राजकारण झालं, असंही बोललं जात आहे. खुद्द पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करूनही त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याची बोचरी टिकाही बाळा भेंगडे यांनी केली आहे.

पिंपरी : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील पराभव हा भगीरथ भालकेंचा नाही, तर तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भाजपचे सोलापूर जिल्हा प्रभारी आणि माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी दिली. या निकालाने राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल, असे ते ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

राज्याचे लक्ष लागून असलेल्या या विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालाने राज्यातील घडामोडी बदलतील, असे भाकीतही भेगडेंनी केले. हा निकाल राज्य सरकार आणि अजित पवार यांच्याविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. कारण पंढरपूर-मंगळवेढ्यातील गल्लीबोळात उतरून पवारांनी प्रचार केला. ते स्वतः पाच दिवस तेथे तळ ठोकून होते. मंत्रीमंडळही त्यांनी प्रचारात उतरवलं होतं. मात्र,त्यांच्या प्रचाराच्या भुमिकेला स्थानिक जनतेनं नाकारलं. कारण त्यांचं पाणी पवारांनी पळविलंय. त्याचा राग निकालातून मतदारांनी बाहेर काढला. दीड वर्षातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधातील राज्यातील जनतेचा रोष पंढरपूर-मंगळवेढ्याच्या मतदारांनी व्यक्त केला, असेही भेगडे म्हणाले.

या निवडणुकीत पाण्याच राजकारण झालं, असंही बोललं जात आहे. खुद्द पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करूनही त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याची बोचरी टिकाही बाळा भेंगडे यांनी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी यांनीही  ‘समाधान आवताडे यांना निवडून द्या, मी राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो’,  असे वक्तव्य केले होते. त्यातच बाळा भेंगडेंनी ‘या विधानसभेच्या पोटनिवडणूक निकाला राज्यातील घडामोडी बदलतील’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय बदल होतील आणि घडामोडी वेग घेतील, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागलेले आहे. 

हेही वाचा : नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत, अजय नाहीत...

या निकालावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, पंढरपूर निवडणूक महत्वाची होती. सरकारच्या कामगिरीचा लेखाजोगा मांडणारी ठरली. दीड वर्षातल्या महाविकास आघाडी सरकारच्या अपयशी कामगिरीविषयीची चीड या निवडणुकीत दिसली. अवकाळी पाऊस, कोरोना, नुकसान भरपाई याबाबत सरकारने कुठलीच मदत न केल्याने नाराजी दिसून आली. महाविकास आघाडीला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. नाना पटोले मोदींवर टीका करतात. शेजारचा पोरगा पास झाला म्हणून त्यावर जल्लोष करताना महाविकास आघाडीचे नेते दिसत आहेत, असा टोलाही देरकर यांनी लगावला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख