नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत, अजय नाहीत... - narendra modi and amit shaha are not invincible | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत, अजय नाहीत...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 मे 2021

मोठमोठ्या सभा, रॅलीज, पैशांचे वाटप केले तरी पश्‍चिम बंगालची जनता त्याला भुलली नाही आणि सत्याच्या सोबत राहिली. देशात कोरोनाचे संकट आ वासून उभे असतानाही केंद्रातील सत्ताधारी प्रोटोकॉल तोडून वागले, नेमकी हीच बाब जनतेला रुचली नसावी.

नागपूर : भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारची सर्व ताकद एकवटून बंगालची निवडणूक लढविली. त्यांची सत्ता असलेल्या सर्व राज्यांतून बलाढ्य नेत्यांना त्यांनी बंगालमध्ये अजमावले. पण बंगालच्या जखमी वाघिणीने एकाकी लढा देत सत्ता काबीज केली. आजच्या निकालातून ममता दीदींनी दाखवून दिले की, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे अजिंक्य नाहीत, अजय नाहीत. केंद्र सरकारच्या सर्व ताकदीशी लढून बंगालच्या वाघिणीने ऐतिहासिक विजय मिळविला, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. 

खासदार राऊत म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हरविण्यासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टिमने सर्व शक्ती पणाला लावली होती. पण दीदींनी एकाकी लढा देत. भारतीय जनता पक्षाला धूळ चारली. आता नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांची सर्व यंत्रणा तोंडाच्या भारावर पडली आहे. आपल्या देशातील लोकशाही अमर आहे. आजचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. भाजपने ममता बॅनर्जींना जखमी केले आणि ही जखमी वाघीण अधिक आक्रमक होऊन मोदी सरकारच्या सर्व यंत्रणांवर तुटून पडली. केंद्राने आपल्या सर्व संस्था त्यांच्या विरोधात उभ्या केल्या होत्या. पण त्यांच्याशी एकहाती लढत ममतांनी विजय मिळविला. 

ममता बॅनर्जींनी पश्‍चिम बंगालच्या ग्रामीण भागात चांगली पकड मिळविली आहे. पंचायत निवडणुकांमध्ये त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कामी आले. भाजपला आता नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील सर्व नेत्यांनी ममतांचे अभिनंदन केले आहे. आता देशपातळीवर मोदींसमोर मोठे आव्हान उभे केले जाईल, असेही मानले जात आहे. देशाला संकटात ठेवून निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून चक्क पंतप्रधान मोदी यांनी उतरावे लागले, हे दुर्दैव आहे. पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या ममतांच्या विजयाचे पडसाद महाराष्‍ट्रात उमटणार, ही चर्चा निवडणुकीपूर्वी होती. ती आता खरी ठरणार, असं दिसतंय. 

हेही वाचा : निवडणूक निकालाच्या धामधुमीतही ममतादीदी म्हणाल्या, महाराजा तोमारे सलाम!

मोठमोठ्या सभा, रॅलीज, पैशांचे वाटप केले तरी पश्‍चिम बंगालची जनता त्याला भुलली नाही आणि सत्याच्या सोबत राहिली. देशात कोरोनाचे संकट आ वासून उभे असतानाही केंद्रातील सत्ताधारी प्रोटोकॉल तोडून वागले, नेमकी हीच बाब जनतेला रुचली नसावी. बंगालच्या निकालांनी हे तर स्पष्ट केलं की, दिल्लीवरून येऊन दादागिरी चालणार नाही. जनता सगळे ठरवते की, कुणाला निवडून द्यायचे आहे. त्यांच्यावर कोणत्याही दबावाचा परिणाम होत नाही, असेही खासदार संजय राऊत म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख