ईडीच्या जाळ्यात कोणकोणते मंत्री अडकणार, हे सोमय्या यांनी एका दमात सांगितले.... - Kirit Soamiya takes names of minister who soon be in net of ED | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

ईडीच्या जाळ्यात कोणकोणते मंत्री अडकणार, हे सोमय्या यांनी एका दमात सांगितले....

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 18 जुलै 2021

शिवसेना आणि राष्ट्रवादीत धाकधूक.. 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी जोरदार आरोप केले आहेत. त्यांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांची माया जमविल्याचा दावा सोमय्या यांनी करत खळबळ उडवून दिली. याशिवाय देशमुख यांच्यानंतर कोणत्या मंत्र्यांचा क्रमांक ईडीच्या कारवाईत लागणार आहे, ही नावे पण त्यांनी एका दमात सांगितली.

ईडीने देशमुख यांची सुमारे साडेचार कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली होती. नंतर ही जप्त केलेली मालमत्ता सुमारे तीनशे कोटी रुपयांची असल्याचा दावा करण्यात आला. अर्थात ईडीने याला दुजोरा दिला नाही. शंभर कोटी रुपयांचे कॅश ट्रेल सापडल्याचे सोमय्या यांनी जाहीर केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे. पुढील काही दिवसांत देशमुख आणि त्यांच्या परिवाराची प्रापर्टी जप्त होणार आहे. एवढेच नाहीतर खुद्द देशमुख यांनाच जप्त व्हावे लागेल आणि त्यांना जेलमध्ये जावे लागेल. त्यांच्यानंतर अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड या दोन मंत्र्यांचाही नंबर लागणार असल्याचे त्यांनी त्याच व्हिडीओत सांगितले. 

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहेच. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे काल पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचेही नाव घेतले होते. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाला तर टार्गेट करण्याचे प्रयत्न नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

वाचा ही बातमी : कोल्हे यांचा आढळरावांवर नेम पण मुख्यमंत्र्यांवर वार

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या(ईडी)कारवायांचा धसका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. कोणताही दगाफटका नको याची खबरदारी घेताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हवालदिल झाले आहेत तर शिवसेनेच्या नेत्यांची धाकधुक वाढली आसल्याचे सांगितले जाते.

भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांविरोधात तसेच भाजपच्या विरोधात जोरदार आवाज उठवणाऱ्या नेत्यांना ‘ईडी’चा धाक दाखवून जेरीस आणले जाते.असा भाजपवर विरोधी पक्षांचा देशपातळीवर आरोप आहे. छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ‘ईडी’बाबत जाणीव झाली. त्यानंतर आता ‘राष्ट्रवादी’चे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी ‘ईडी’ने सुरू केली आहे. देशमुख यांच्या कुटुंबाची चौकशी सुरू आहे. याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जुन्या प्रकरणावरून पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. यामुळे प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हवालदिल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या चौकशीचे शुक्लकाष्ट सुरू आसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आसलेल्या संस्थांना देखील ईडीने लक्ष्य केले आहे.त्यामुळेदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घालमेल वाढल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेनेत देखील धाकधुक वाढली असल्याचे शिवसैनिकांत चर्चा आहे.आमदार प्रताप सरनाईक यांची मागील काही महिन्यांपासून ईडी चौकशी करीत आहे.सरनाईक यांनी तर मध्यंतरी ईडीच्या छळातून मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजप बरोबर पुन्हा घरोबा करण्याची विनंती केली होती. तर मंत्री अनिल परब यांच्या विषयी राज्य भाजपाचे नेते जाहीरपणे कारवाईची भाषा करीत आसतात. यामुळे शिवसेनेत धाकधुक वाढल्याचे सांगितले जाते.
राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना या पक्षातील नेते,आमदार यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.याची नोंद घेत काँग्रेसचे नेते,मंत्री सावध पावले टाकत आहेत. एकंदरीत ईडीच्या धसक्याने महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते सावध भुमिकेत असल्याचे मानले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख