कोल्हे यांचा आढळरावांवर नेम.. पण मुख्यमंत्र्यांवरच राजकीय वार - MP Amol Kolhe targets Adhalrao but criticizes CM Thackeary | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

कोल्हे यांचा आढळरावांवर नेम.. पण मुख्यमंत्र्यांवरच राजकीय वार

राजेंद्र सांडभोर
रविवार, 18 जुलै 2021

मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर शरद पवारांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी सुनावले. 

राजगुरूनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहेच. पण ते शरद पवारांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झाल्याचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचे विधान शिवसेनेला जोरदार झोंबले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हे आणि माजी खासदार आढळराव यांच्यातील वाद राज्य पातळीवर पोहोचला. त्यामुळे सेनेनेही कोल्हे यांना तसेच उत्तर दिले आहे. (MP Amol Klohe criticizes CM Uddhav Thackeray)

पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बाह्यवळणाचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत देवराम थिगळे व अन्य शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कोल्हे यांनी आढळराव यांच्यावर थेट टीका केली. त्यानंतर नारायणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात थेट शिवसेनेलाही लक्ष्य केले.

विमानतळ गेले, पुणे वाहतूक कोंडी सोडविता आली नाही, रेल्वेचे काम सुरू करता आले नाही, बैलगाडा प्रश्न सोडविता आला नाही, चाकण शिक्रापूर रस्ता करता आला नाही, पुणे नाशिक चौपदरीकरण रखडले, पुढे सहापदरीकरण करता आले नाही. अशा अनेक कामांचे अपश्रेय घ्यायलाही आढळरावांनी पुढे यावे, असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना लगावला खेडमध्ये लगावला. 

वाचा ही बातमी : शिवसेनेची कोल्हे यांच्यावर कडवट टीका

 डॉ. कोल्हे म्हणाले, ' पुणे-नाशिक रेल्वेमार्ग व्हावा, ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा होती. त्याचे सर्वेक्षण सुरेश कलमाडी यांच्या काळापासून सुरू आहे. तीन वेळा निवडून दिल्यावर त्याचा पाठपुरावा करणे माजी खासदारांचे कर्तव्यच होते. त्यांचे सरकार असतानाही त्यांना रेल्वेचा डीपीआर सभागृहापुढे आणता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारच्या २० टक्के भागीदारीला मान्यता दिली. त्यानंतर मी पाठपुरावा केला व काम मार्गी लागले.पण मला कशाचे श्रेय घ्यायचे नाही. मी लोकांचा सेवक आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार आहे.' 

 शिरूर मतदारसंघात शिवसेनेने सुरू केलेले शिवसंपर्क अभियान हे पक्षवाढीसाठी नसून फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करण्याचा कार्यक्रम आहे. त्यांच्यामुळे शिरूर मतदारसंघात महाविकास आघाडी राहिली नाही. खरंतर निवडणूक झाल्यावर राजकारण विसरून विकासकामे केली पाहिजेत. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी त्यांच्यावर  शरद पवारांचा वरदहस्त आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी सुनावले. 

खेड घाटाच्या कामाचे खरे श्रेय नितीन गडकरींचे आहे. 
कार्यादेश मी खासदार झाल्यावर निघाले. आढळरावांच्या काळात आराखडा झाला. त्यात स्वतःच्या हितसंबंधांतील जमिनीच्या सोयीसाठी व शाळा वाचविण्यासाठी, त्यांनी हे बाह्यवळण सध्याच्या बाजूने घेतले आणि ते अडीच किलोमीटरऐवजी साडेचार किलोमीटरचे झाले, असे कोल्हे म्हणाले. 

 मोशी ते राजगुरुनगर सहापदरीकरणाच्या ६६० कोटींच्या कामाची निविदा झाली आहे. तळेगाव ते शिक्रापूर चौपदरीकरणासाठी ६०० कोटी मंजूर झालेत. उरण- पनवेल- भीमाशंकर-शिरूर रस्ता राष्ट्रीय महामार्ग होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

आढळराव खेड तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये भांडणे लावायची कामे करतात. ते आंबेगाव तालुक्यातील विकासकामांना विरोध करत नाहीत,  मात्र खेड तालुक्यात सतत विरोध करतात. मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने एखादेतरी काम खेड तालुक्यात आणायला पाहिजे होते. व्यवसाय खेड तालुक्यात करतात, पण खेड तालुक्यात कामे काही आणली नाहीत. शिरूर मतदारसंघातही फक्त आश्वासनांची खैरात केली. कामांच्या फक्त कल्पनाच मांडल्या. याउलट खासदार कोल्हे प्रत्यक्षात कामे करत आहेत. म्हणून पुढचे खासदारही कोल्हेच होणार आहेत, असे यावेळी मोहिते म्हणाले. 

आमदार दिलीप मोहिते यांचीही टीका

आढळरावांनी आधीच घाटाचे उद्घाटन करून केलेल्या नौटंकीचा आम्ही निषेध करतो. ओरिजिनल ॲक्टर असलेले कोल्हे यांना अभिनय शोभतो. पण ते खासदार झाल्यानंतर डुप्लिकेट ॲक्टर आढळराव यांनी ड्रामा करायला सुरुवात केली आहे. कायदा हातात घेतला, म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांना विनाकारण दिलेले पोलीस संरक्षण काढून घ्यावे. ते स्वतःच भाई झालेत, त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख