गुलाबराव पाटलांची चतुर चाल : भाजपला दणका दिला पण खडसेंना अंगावर नाही घेतले... - Gulabrao patil shows smartness in defacting bjp in Jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

गुलाबराव पाटलांची चतुर चाल : भाजपला दणका दिला पण खडसेंना अंगावर नाही घेतले...

कैलास शिंदे
रविवार, 30 मे 2021

दुसरीकडे सत्ता गेल्यानंतर आपलेही जवळ राहतं नाहीत, असे भाजपला नगरसेवक गळतीमुळे कळू लागले आहे.

जळगाव : सत्ता अक्कल शिकवते तर अपयश तुमची कसोटी घेतो असे म्हटले जाते. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भाजप, शिवसेनेच्या बाबतीत आज हेच दिसून येत आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपची (BJP) सत्ता केंद्र ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला आहे, सतेचा फायदा घेऊन पक्ष वाढविला पाहिजे याची सूत्र सेनेला कळले आहे, तर दुसरीकडे सत्ता गेल्यानंतर आपलेही जवळ राहतं नाहीत, असे भाजपला नगरसेवक गळतीमुळे कळू लागले आहे. (Shivsena gives jolt to BJP in Jalgaon)

भारतीय जनता पक्ष हा मुळातच शिवसेनेचे बोट धरून राज्याप्रमाणे जळगाव जिल्ह्यात वाढला. सन १९९७ मध्ये राज्यात युतीचे सत्ता असताना भाजपने चाणाक्षपणे स्वतःचा विस्तार केला,त्या वेळी शिवसेनेला त्याचा फायदा घेता आला नाही, भाजपने विस्तार करीत लोकसभेचा दोन जागा आपल्याकडे घेतल्या, जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात ठेवली,शिवसेना मात्र युतीत दुय्यम स्थानी राहिली.

ही बातमी वाचा : नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात

सत्तेनंतर उपरती
नुकताच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजप- सेनेची युती तुटली. शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली त्यांनी सत्ता स्थापन करीत राज्याचे मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतले.याच सत्तेचा फायदा जळगाव जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी सुरू केला आहे .

भाजपवर हल्ला
शिवसेनेने जिल्ह्यात आपला जुना मित्र भाजप वर हल्ला सुरू केला आहे. सर्वात प्रथम ज्या जळगाव महापालिकेवर भाजपने आपल्या सत्ता काळात इतर पक्षाचे नगरसेवक फोडून त्यांना निवडणुकीत उभे करून तब्बल ५७ नगरसेवक निवडून आणून झेंडा फडकवला होता. शिवसेनेने अडीच वर्षांनी भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून आपला महापौर बसवून सत्ता मिळविली. त्या नंतर मुक्ताईनगर नगरपरिषदेचे सहा सदस्य फोडून भाजपला आणखी दणका दिला आहे.

नेते चाणाक्ष
जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारणात शिवसेना नेते चाणाक्ष दिसून आले, त्यांनी या फोडाफोडीचे श्रेय आपल्याकडे घेतलेच परंतु त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यानाही सहभागी करून घेतले, शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यानी एकनाथराव खडसे यांच्या आदेशाने आम्ही भाजपचे नगरसेवक घेतले असल्याचे सांगत यात पुन्हा एक चाणाक्षपणा दाखवत सत्तेतील घटक पक्षाचे नेते खडसे यांच्याशी वाद टाळला, दुसरीकडे खडसे यांनी ही या बाबतीत अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित असले तरी भाजपला पर्याययाने भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला धक्का देण्याचा दोघांचा उद्देश सफल झाल्याचे दिसत आहे. मात्र या राजकारणात भाजपला गळती लागली असली तरी जिल्ह्यातील शिवसेना नेतृत्वही आता पक्ष विस्ताराच्या दृष्टीने कळते झाले आहे. मात्र महाजन यांच्या जामनेर तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादीने हल्ला करून फोडाफोडी केल्यास खऱ्या अर्थाने तो भाजपला झटका मानला जाईल, एवढे मात्र निश्चित.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख