...तरीही आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही ! - yet we will not call bjp leaders champa or watermelon | Politics Marathi News - Sarkarnama

...तरीही आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही !

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

नितीन गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे करून चंद्रकांत पाटील गडकरींचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचा आवाज ते बंद करू शकणार नाहीत.

मुंबई ःभाजपच्या नेत्यांनी केंद्रात सरकार असल्याने त्याचा फायदा उचलण्याची एकही संधी सोडलेली नाही. या लोकांना राज्यातील जनतेची अजिबात काळजी नाही, तर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठीचे सर्व प्रयत्न असफल झाल्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांचा तोल सुटलेला आहे आणि ते पातळी सोडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर तोंडसुख घेऊ लागले आहेत. त्यांनी पातळी सोडली असली तरी आम्ही आमची संस्कृती सोडणार नाही. आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही, yet we will not call bjp leaders champa or watermelon  असे प्रत्युत्तर देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांनी चंद्रकांत पाटलांना टिमटा काढला आहे. Chandrakant Patil. 

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभैर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. 

गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. गंगेच्या पात्रातून वाहणारे मृतदेह हजारो जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत, असा घणाघात पटोले यांनी केला. 

मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. पण चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आम्हाला कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही. त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल आणि मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील. केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे, असे नाना पटोले म्हणाले. 

हेही वाचा : नांदेडच्या भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, मात्र धक्के जाणवले नाहीत...

नितीन गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे करून चंद्रकांत पाटील गडकरींचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचा आवाज ते बंद करू शकणार नाहीत. आम्ही देशातील गरीब, कष्टकरी जनता व शेतक-यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज बुलंद करत राहू. ईडी, सीबीआयचा वापर करून मोदी शाह आमचा आवाज बंद करू शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पोपटपंची करण्यापेक्षा केंद्राने जाणीवपूर्वक अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख