शिवसेनेला लागलीय का गळती? युवासेनेच्या शहर समन्वयकाचाही राजीनामा...  - why did shiv sena get leaked yuva senas city coordinator also resigned | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

शिवसेनेला लागलीय का गळती? युवासेनेच्या शहर समन्वयकाचाही राजीनामा... 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 1 सप्टेंबर 2021

मध्यंतरी युवा सेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी समन्वयक उपस्थित होते. त्यानंतर तातडीने मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांना तंबी दिली होती. गटबाजी थांबवण्याचे आदेश दिले होते.

नागपूर : शिवसेनेचे विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब अधूनमधून शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत असतात. पण नागपूर जिल्हाप्रमुख राहिलेले शेखर सावरबांधे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सैनिकांच्या मनांत खदखदत असलेला असंतोष बाहेर पडू लागला आहे. सावरबांधे यांच्या पाठोपाठ युवा सेनेचे शहर समन्वयक तुषार कोल्हे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. 

कोल्हेंनी राजीनामा दिल्यानंतर नागपुरात सेनेला गळती लागली, का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शहर शिवसेनेत असंतोष खदखदत असताना ग्रामीणमध्येही तीच स्थिती आहे. अनेक निष्ठावान शिवसैनिक सध्याच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत आणि सेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हे यांनी युवा सेनेचे प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. सोबतच युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई, नागपूरचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी, विस्तारक धरम मिश्रा यांनाही राजीनाम्याची प्रत पाठविली आहे. 

युवा सेनेचा समन्वयक म्हणून आपणास कुठलाही मानसन्मान मिळत नाही. पक्षाचे कार्यक्रम, आंदोलनाची माहिती दिली जात नाही. आपण या पदावर कायम असताना नवीन समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे समन्वयक पदाचा राजीनामा देऊन सामान्य शिवसैनिक म्हणून आपण कार्य करणार असल्याचे तुषार कोल्हे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई अलीकडेच नागपूर दौऱ्यावर येऊन गेले. ग्रामीणची कार्यकारिणी त्यांनी जाहीर केली होती. शहर कार्यकारिणीबाबत वाद असल्याने त्यांनी कार्यकारिणी रोखून ठेवली आहे. 

ही बातमी वाचा ः ...तर डायनासोरसारखे शिवसैनिकही नामशेष होऊन जातील !

मध्यंतरी युवा सेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी समन्वयक उपस्थित होते. त्यानंतर तातडीने मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्हाप्रमुखांना तंबी दिली होती. गटबाजी थांबवण्याचे आदेश दिले होते. हा वाद अद्याप शमला नसतानाच शहर समन्वयकाने राजीनामा दिला आहे. शहरातील युवा सेनेची सर्व चमू शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असल्याचे समजते.

ही बातमी पण वाचा ः उपराजधानीत शिवबंधन होतेय सैल, श्रेष्ठींनी पाठवला ‘हा’ निरोप...

आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात कोल्हे म्हणतात, ‘माननीय महोदय, आपणास या अर्जाव्दारे मी माझ्या युवासेना शहर समन्वयक या पदाचा राजीनामा देत असून यानंतर मी शिवसैनिक, युवासैनिक म्हणून भविष्यात काम करील. युवासेना नागपूर जिल्हा अंतर्गत मला कोणताही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही व कोणताही आंदोलनाचा वेळेस जाणीव पुर्वक दुर्लक्ष करण्यात येते. माझा कडे सामना अंतर्गत आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत शहर समन्वयक हे पद असुनसुध्दा मला न विचारता नवीन शहर समन्वयक पद देण्यात आले. मी पक्षाचा आदेशानुसार सातत्याने काम करीत असून मला डावलण्यात येत आहे.

मी सदैव हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबाचा विचाराशी निगडीत असलेला कार्यकर्ता आहे. राज्याचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याव्दारे करत असलेले लोक कल्याण कामे व युवा सेनाप्रमुख, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचे युवकांसाठी सातत्याने करत असलेली कामे मी सतत पक्षाच्या आदेशानुसार शिवसैनिक युवा सैनिक म्हणून करत राहील. तरी आपणास विनंती आहे की आपण माझा शहर समन्वयक पदाचा राजीनामा स्वीकारावा ही विनंती.’
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख