‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगार रणजीत सफेलकरला होता राजकीय वरदहस्त... - white collar criminal ranjeet safelkar had political clout | Politics Marathi News - Sarkarnama

‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगार रणजीत सफेलकरला होता राजकीय वरदहस्त...

अनिल कांबळे
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

रणजीतने आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाची सुपारी पाच कोटीत घेतली. कुठेही समोर न येता कालू हाटेकडून हत्याकांड घडविले. तसेच कुख्यात मनिष श्रीवास याची टोळी मोठी होत असल्यामुळे स्वतःच्या जिवाच्या भीतीने मनिषचा खून केला. शेवटी दोन्ही हत्याकांडात त्याचा चेहरा समोर आला.

नागपूर : राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय गुन्हेगारी फोफावू शकत नाही. पुढारीच गुन्हेगार तयार करतात, असेही म्हटले जाते. कुख्यात गुंड आणि कथित नेता रणजीत सफेलकरचे प्रकरण पाहता ही बाब पटते. निमगडे हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेल्या सफेलकरची पोलिसांना अनवाणी ‘वरात’ काढली. एकेकाळी सेकंडहॅंड ऑटो चालवून चरितार्थ भागविणारा काडीमोडीचा रणजीत सफेलकर हा अचानक प्रकाशझोतात आला. शंभर रुपयांची सवारी ऑटोतून घरी सोडणारा रणजीत चक्क पाच-पाच कोटींची हत्याकांडाची सुपारी घ्यायला लागला. राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे रणजीत भाजपचा स्टार चेहरा ठरत ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगार बनला होता. पण पोलिसांनी त्याला जेरबंद करून एका दहशतीचा अंत केला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत सफेलकर हा बेरोजगार युवक होता. त्याला चार ते पाच मित्रांनी एक सेकंड हॅंड ऑटो विकत घेऊन दिला. ऑटो चालक रणजीत काही दिवसांतच नागपुरातील ऑटोचालक संघटनेचा नेता झाला. त्याची ओळख कुख्यात गुंड राजू बद्रे याच्याशी झाली. काही आटोचालकाला हातीपदरी धरून रणजीतने गॅंग बनवली. बद्रेशी हातमिळवणी केल्यानंतर रणजीतने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. काही महिन्यातच रणजीतने गुन्हेगारी जगतात स्वतःची गॅंगस्टर म्हणून ओळख निर्माण केली. राजू बद्रेच्या मैत्रीपोटी त्याने नागपूर सोडले आणि कामठीत बस्तान मांडले. कामठीत त्याने अवैध दारूविक्री, जुगार, मटका आणि ड्रग्स विक्रीमध्ये हात अजमावला. त्यानंतर मोठमोठ्या व्यापाऱ्यांना ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावावर खंडणी मागणे, शहरातील भूखंड हडपणे, बळजबरीने गरीबांची घरे खाली करणे, कब्जा मारणे आणि सुपारी घेण्याचे काम करायला लागला. २००७ मध्ये सर्वाधिक शक्तीशाली गॅंगचा लिडर म्हणून रणजीत उदयास आला. ४० रुपयांच्या देशीची पावटी पिण्यासाठी धावपळ करणारा रणजीत २०१८ मध्ये अचानक कोट्यधीश झाला. ऑटोचालक, गुन्हेगार ते राजकीय नेता असा वादग्रस्त प्रवास रणजीतने केला. 
 

राजकीय वरदहस्त 
गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या रणजीतला भाजपाच्या एका माजी आमदाराने हेरले. गुंडाच्या टोळीचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा सल्ला दिला. त्या आमदाराच्या पायाची धूळ डोक्याला लावून रणजीतने राजकीय प्रवास सुरू केला. टोळीचा वापर त्या आमदाराच्या फायद्यासाठी करायला लागला. त्याचे फळ म्हणून रणजीतला भाजपाचे तिकीट देण्यात आले. तो कामठी नगरपरिषदेत निवडून आला आणि नगर उपाध्यक्ष बनला. त्याने आमदाराचे उपकार विसरून थेट त्यालाच चॅलेंज दिले. मंत्रिपदी असताना शिवीगाळ करीत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. 
 
ब्लॅकमेलिंगसाठी श्रीराम सेना 
गोमांस विक्री, कत्तलखाना आणि गोतस्करीत कोट्यवधींची उलाढाल होत असल्याचे रणजीतच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने अशा व्यापाऱ्यांकडून खंडणी, पठाणी वसुली करण्यासाठी श्रीराम सेना स्थापन केली. त्या माध्यमातून वसुली सुरू केली. श्रीराम सेनेची फ्रॅंजाईजी घेणाऱ्याला दोन लाख रुपये आणि कार्यालयाची जागा आणि कार्यालयाचा कायमचा खर्च देण्याची योजना आखल्यामुळे जवळपास महाराष्ट्रात श्रीराम सेना पसरली असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : स्फोटक प्रकरणात आलेल्या धमकीमागे अंडरवल्डची मदत
 
स्वतःच्या जिवाची भीती 
रणजीतने आर्कीटेक्ट एकनाथ निमगडे यांच्या हत्याकांडाची सुपारी पाच कोटीत घेतली. कुठेही समोर न येता कालू हाटेकडून हत्याकांड घडविले. तसेच कुख्यात मनिष श्रीवास याची टोळी मोठी होत असल्यामुळे स्वतःच्या जिवाच्या भीतीने मनिषचा खून केला. शेवटी दोन्ही हत्याकांडात त्याचा चेहरा समोर आला. सीपी अमितेश कुमार हे एन्काऊंटर करतील, या भीतीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी अनेक राज्यात पळत होता. शेवटी त्याला जेरबंद करून नागपूर पोलिसांनी एका दहशतीचा अंत केला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख