काय आहे हा किन्होळा पॅटर्न?, जो जिल्हाधिकारीही राबविणार आहेत.... - what is this kinhola pattern which is also going to implemented by the collector | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

काय आहे हा किन्होळा पॅटर्न?, जो जिल्हाधिकारीही राबविणार आहेत....

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

आयसोलेशन सेंटरबाबत गावातील प्रमुखांची तात्काळ एक बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत रविकांत तुपकरांनी कोरोनाची भीषणता आणि त्याचा सर्वांनी मिळून कसा मुकाबला केला पाहिजे हे पटवून दिले. लोकवर्गणीतून, लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याच्या तुपकरांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी गावकरी सरसावले.

बुलडाणा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणची कोविड आयसोलेशन सेंटर फुल्ल भरली आहेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत जर गावोगावीच आयसोलेशन सेंटर उभी राहिली तर कोरोनाला आळ बसू शकेल. दुसरीकडे शासकीय यंत्रणेवर यासाठी निर्भर राहून या प्रक्रियेला उशीर करण्यापेक्षा लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभी करावीत तसेच एकजुटीतून व सामूहिक प्रयत्नांनी कोरोनाला हद्दपार करू या, अशा उदात्त हेतूने येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील किन्होळा गावात गावकऱ्यांनी जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर उभारले आहे. यामध्ये स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचेही योगदान आहे. 

लोकांनी लोकांसाठी लोकसहभागातून सुरू केलेल्या या आयसोलेशन सेंटरचे जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी भरभरून कौतुक केले आहे. लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरचा किन्होळा पॅटर्न संपूर्ण जिल्हाभर राबविणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आज, सकाळी ११ वाजता किन्होळा गावचे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक प्रभू काका बाहेकर यांच्या हस्ते आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सदर आयसोलेशन सेंटरचे मुख्य संकल्पक तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हाधिकारी एस.राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र सांगळे, शासकीय कोविड सेंटरचे प्रभारी डॉ.सचिन वासेकर, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ, सरपंच अर्चना वसंत जाधव असे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर उभारण्याचा उपक्रमाने मी भारावलो आहे. गावकऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी.’ विशेष म्हणजे भारावलेल्या जिल्हाधिकारी यांनी आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन स्वतःच्या हातून न करता किन्होळा गावातील ज्येष्ठ नागरिक प्रभू काका बाहेकर यांच्या हस्ते करून घेतले. उपरोक्त मान्यवरांनी यावेळी संपूर्ण आयसोलेशन सेंटरची पाहणी केली. त्या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, स्वच्छता आणि व्यवस्थेचे सर्वानीच कौतुक केले. जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया यांनी सेंटरवरील नीटनेटकेपणाची विशेष प्रशंसा केली. आपल्या मार्गदर्शनात डॉ. सचिन वासेकर यांनी कोरोनाची भयावहता स्पष्ट केली. आजमितीस किन्होळाप्रमाणे जिल्हाभरातील मोठ्या गावांमध्ये आयसोलेशन सेंटर उभे करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी बोलून दाखविले. या सेंटरला सतत भेट देऊन रुग्णांवर उपचार करण्याची हमीही डॉ.वासेकर यांनी दिली.

यावेळी किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिल साळोख, डॉ.अनिल पांढरे, डॉ.आकाश सदावर्ते, डॉ.स्वप्निल अनाळकर, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ.भाग्यश्री खेडेकर, डॉ.दिपाली महाजन, गावच्या उपसरपंच कल्पना राजपूत, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर, राजू बाहेकर, मधुकर बाहेकर, ग्रामपंचायत सदस्य शेख आरिफ शेख रज्जाक, ग्रामसेवक रमेश मुंडे, कृषी सहाय्यक विष्णू डुकरे, शेख ताहेर शेखजी, भगवानसिंग राजपूत, दिनकर बाहेकर, बबनराव बाहेकर, अॅड. विश्वासराव बाहेकर, शिक्षक वृंद यांच्यासह अनेक मान्यवर आणि गावातील तरुण मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होती. 

रविकांत तुपकरांची आर्त साद....
गावागावांत आयसोलेशन सेंटर उभारून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे केली होती. गावागावांमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. किन्होळा गावामध्ये ५ जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. या गावात तात्काळ आयसोलेशन सेंटर उभारून कोरोनाला आळा घालण्यासाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचा तुपकरांनी निश्चय केला. ४ दिवसांपूर्वी त्यांनी या संदर्भात किन्होळा गावातील ज्येष्ठ आणि तरुण दोन्ही वर्गाची भेट घेऊन आपला संकल्प बोलून दाखविला. गावचे प्रतिष्ठित व्यक्ती प्रभूकाका बाहेकर, सरपंच अर्चना जाधव, त्यांचे समाजसेवक पती वसंत जाधव आणि ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील अनेकांनी याला सहमती दर्शवून जोरदार पाठिंबा दिला. 

आयसोलेशन सेंटरबाबत गावातील प्रमुखांची तात्काळ एक बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत रविकांत तुपकरांनी कोरोनाची भीषणता आणि त्याचा सर्वांनी मिळून कसा मुकाबला केला पाहिजे हे पटवून दिले. लोकवर्गणीतून, लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याच्या तुपकरांच्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी गावकरी सरसावले. अवघ्या एका तासात दीड लाख रुपयांचा लोकनिधी जमा झाला. नंतर नवीन खाटा घेण्यापासून ते औषधोपचारापर्यंत आणि भोजन-पाण्याच्या व्यवस्थेपासून ते शौचालयापर्यंतच्या सूक्ष्म बाबींचे नियोजन करून सर्व गोष्टी साकारण्यात आल्या. भारत विद्यालयाचे प्रा.अरविंद पवार यांनी विविध समित्यांचे गठन करून कामात सुसूत्रता आणली. गावातील जवळपास ५० पेक्षा अधिक तरुण स्वयंसेवक म्हणून विविध समित्यांच्या माध्यमातून कार्यरत झाले आहेत. ‘किन्होळा गावाला कोरोना मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू’. या निश्चयासह गावचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य यंत्रणा, आशा वर्कर तसेच राजे छत्रपती मंडळाचे तरुण तसेच गावकरी मिळून कोविड आयसोलेशन सेंटरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.  

किन्होळा पॅटर्न यशस्वी करण्याची जबाबदारी गावकऱ्यांची : अरविंद चावरिया
किन्होळा कोविड आयसोलेशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी संवाद साधताना जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी किन्होळा गावातील लोकांच्या समर्पित भावनेचे कौतुक केले. ‘ग्रामीण भागात कोरोनाला घेऊन वेगळेच चित्र दिसत आहे. कोरोना झाला , हे सांगायची अनेकांना लाज वाटते. यातून अनेक जण कोरोनाची माहिती लपवत आहेत आणि त्यातून कोरोना आणखी वेगाने पसरत आहे. अनेक जण तर अंगावरच दुखणे काढतात. संपूर्ण गावाला अशा लोकांमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. म्हणून मनात कुठलीही तमा व भीती न बाळगता कोरोनाची टेस्ट करून घ्या.’ या शब्दात चावरियांनी किन्होळावासियांना आवाहन केले. कोविड आयसोलेशन सेंटरचा उपक्रम एकजुटीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कोरोना संदर्भातील नियम न पाळल्यास व लक्षणे असतानाही टेस्ट करण्यास नकार दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही चावरिया यांनी सांगितले.

हेही वाचा : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात! 

कसा आहे किन्होळा पॅटर्न ?
•    गावाच्या एका भागात श्री.शिवाजी हायस्कूलच्या सुसज्ज इमारतीत ५० बेडचे कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू.
•    पाणी, भोजन, नाश्ता आणि शौचालयाची उत्कृष्ट व्यवस्था. 
•    विस्तीर्ण परिसरात पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळे कक्ष.
•    प्रत्येक कक्षात सोशल डिस्टन्सिंग राखून बेडशीट, उशी, चादर आणि गादीसह नवीन खाटांची व्यवस्था. 
•    पुरेशी प्रकाश व्यवस्था, फॅन आणि स्वच्छतेचे नियोजन .
•    किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांचे पथक कार्यान्वित राहणार.
•    रुग्णांना निःशुल्क औषधोपचाराची सुविधा.
•    रॅपीड अँटीजन कीटद्वारे तपासणीची व्यवस्था. 
•    लसीकरण आणि कोरोना टेस्ट बाबत गावात दररोज प्रबोधनाचे आयोजन.
•    टी.व्ही., प्रोजेक्टरच्या माध्यमातून सकारात्मक माहितीचे प्रसारण.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख