विजय वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पीएच.डी. संशोधक संतापले...  - vijay wadettiwars that statement led to his phd researchers angry | Politics Marathi News - Sarkarnama

विजय वडेट्टीवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याने पीएच.डी. संशोधक संतापले... 

अतुल मांगे
गुरुवार, 6 मे 2021

चारही कृषी विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ‘महाज्योती’ने केलेली १५० जागांसाठीची जाहिरात खूपच कमी आहे. कृषी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील असतात.

नागपूर : ‘महाज्योती’ संस्थेच्या स्थापनेपूर्वी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणार नाही, असे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी ठामपणे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून पीएच.डी. संशोधक (Phd Researchers) चांगलेच संतापले आहेत. काही विद्यार्थ्यांनी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर काहींनी न्यायालयाचे (Court) दार ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. 

‘‘शेतकऱ्यांना (Farmers) विश्वासात न घेता तीन काळे कृषी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारवर राज्यातील महाविकास आघाडी टीका करते. मग शेतकरी पुत्र असलेल्या विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्धवस्त करणारे नियम कसे काय केले जातात. ही दुटप्पी भूमिका नाही काय? ओबीसी कल्याण मंत्री आणि महाज्योतीच्या संचालकांनी केलेल्या काळ्या नियमांचा आम्ही धिक्कार करतो’’, अशी संतप्त खदखद शेकडो विद्यार्थ्यांनी (Students) व्यक्त केली. ‘महाज्योती’ संस्थेच्या स्थापनेपूर्वी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती (Scholarship) देणार नाही, असे ठामपणे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. त्यावरून विद्यार्थी चांगलेच बिथरले आहेत. सर्वच विद्यार्थ्यांनी मंत्रिमहोदयांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. 
 
भटक्या जमातींनी भीकच मागावी काय? 
‘भटक्या जमातीच्या मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे की नाही? २०१९ मध्ये ‘महाज्योती’मार्फत उच्च शिक्षणासाठी मदत करणार म्हणून आम्ही उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. प्रवेश करतेवेळी विद्यापीठाची फी भरण्यासाठी कर्ज काढले. फेलोशिप भेटली की ते कर्ज फेडता येईल, असे वाटले. घरचे म्हणतायेत तुम्हाला पैसे भेटणार होते, त्याचे काय झाले? आम्ही किती दिवस तुम्हाला पोसणार? आम्हाला म्हाताऱ्या वयात त्रास देऊ नका. पण त्यांना आम्ही कसं सांगावं? सरकारजवळ आम्हाला द्यायला काहीच नाही. आम्हाला फक्त सरकारला एव्हढच विचारायचं आहे, ‘आमच्या मायबापांनी स्वप्नं बघावं की नाही?’ आम्ही भटक्यांनी फक्त भीक मागून आणि सावकाराचे घरातले आणि शेतातले गुरं, धूर वळून मरून जायचं?’’ राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून पीएच.डी. करीत असलेला भटक्या विमुक्त प्रवर्गातील संतोष प्रल्हाद शिंदे यांनी हा सवाल थेट ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना केला. 
 

विद्यार्थी मानसिक तणावाखाली 
‘महाज्योती’च्या कारभारामुळे सर्वच विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. एकीकडे सारथी आणि बार्टी संस्थेची सर्वच कामे नियमितपणे चालू आहे. मात्र महाज्योती संस्था कोरोनाचे कारण देत टाळाटाळ करीत आहे. यात ९० टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असून, कोरोनामुळे विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाढलेली आहेत. आमच्या मुद्यावर तत्काळ संचालकांची बैठक बोलवून नवीन जाहिरात काढावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, अशी मागणी, राहुरी येथील दिनेश फुलपगारे यांनी केली. 
 

‘शेतकऱ्यांचा आसूड’ उगारण्यास भाग पाडू नये 
‘सारथी संस्थेने सर्व विध्यार्थ्यांना फेलोशिपचा लाभ दिला, तर मग महाज्योतीने का देऊ नये? सारथीच्या धर्तीवर महाज्योती असताना हा दुजाभाव का? महाज्योतीच्या नावातच महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, असे शब्द आहे. संशोधन शब्द असतानाही आम्हा संशोधकांवर का अन्याय करण्यात येत आहे. आम्ही सर्व शेतकरीपुत्र आहोत. जोतीबा फुलेंचा ‘शेतकऱ्याचा आसूड’ आम्हाला माहिती आहे. तो उगारण्याचस भाग पाडू नये’, असे संतप्त मत हर्षवर्धन मारकड यांनी व्यक्त केले. 
 
नेहा दळी म्हणते, ‘आत्महत्या करायची का?’ 
नेहा मंगेश दळी ही विद्यार्थिनीही पीएच.डी. करतेय. तिने अत्यंत भावनिक होऊन मत मांडले. ‘परिस्थिती नसताना आईबापाने कर्जबाजारी व्हायचं आणि आम्हाला उच्चशिक्षण द्यायचं. त्या मोबदल्यात त्यांनी आमच्याकडून काहीच अपेक्षा करायची नाही का? त्यांनी काय कर्जातच मरायचं? आम्ही उच्चशिक्षण घेण्याचे सोडून काय गळफास लावून घ्यायचा. आमचं खच्चीकरण करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. ओबीसी प्रवर्गासाठी दुजाभाव का? ओबीसी नेते म्हणवून घेणारे ओबीसीच्या हक्कासाठी काहीच करत नसतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकारच नाही. त्यांनी सरळ राजीनामा द्यावा. उच्च शिक्षण घेताना आम्हालाच काहीतरी गुन्हा केल्यासारखे वाटत आहे.’’ 

हेही वाचा : काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभलाय महाराष्ट्राला!
 
चारही कृषी विद्यापीठातून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ‘महाज्योती’ने केलेली १५० जागांसाठीची जाहिरात खूपच कमी आहे. कृषी शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील असतात. उच्चशिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च पाहता विद्यार्थ्यांना ‘महाज्योती’कडून अधिछात्रवृत्ती मिळावी. ५०० जागांची सुधारित जाहिरात केली तर सर्वांनाच लाभ होईल. 
-किरण देशमुख, जिल्हाध्यक्ष, नांदेड, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख