विदर्भवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...

९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आंदोलनाचा पहिला टप्पा नागपुरात यशस्वीपणे पार पडला. सात दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही.
विदर्भवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला ‘चले जाव’चा नारा...
Ram Newale

नागपूर : वेगळा विदर्भ देण्याच्या नावावर मोदी सरकारने Modi Government केवळ आणि केवळ फसवणुकच केलेली आहे. पण आता अधिक अन्याय सहन केला जाणार नाही. जर वेगळा विदर्भ दिला नाही, तर भारतीय जनता पक्षाला BJP विदर्भातून चले जाव म्हणत हद्दपार करून टाकू, असा इशारा विदर्भ आंदोलन समितीचे राम नेवले Ram Newale यांनी आज दिला. 

आज विदर्भात जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात वेगळ्या विदर्भासाठी रस्ता रोको आणि जेल भरो आंदोलन करण्यात आले. नागपुरात गणेशपेठमध्ये बसस्थानक परिसरात आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखून धरला होता. काही महिलांसोबत पोलिसांची झटापटही झाली. आज विदर्भवादी अधिक आक्रमक दिसत होते. याच आंदोलनात पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याचीही मागणी लावून धरण्यात आली. कोरोना काळातील जनतेची विजेची बिले राज्य सरकारने भरावी, अशीही मागणी करण्यात आली. 

केंद्र सरकारने वेगळे विदर्भ राज्य देण्याचे वचन दिले होते. झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड आणि तेलंगणा ही चार राज्ये केंद्र सरकारने दिली. मात्र विदर्भाच्या जनतेला मात्र खोटी आश्‍वासनेच दिली. स्वतंत्र राज्य दिले नाही. त्यामुळे या आंदोलनातून भाजप सरकारला आज इशारा देण्यात आला. आताही जर केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भ दिला नाही, तर आम्ही गावोगावी, मोहल्यामोहल्यात जाऊ आणि भाजपला विदर्भातून हाकलून लावू, असे राम नेवले यांनी सांगितले. 

९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आंदोलनाचा पहिला टप्पा नागपुरात यशस्वीपणे पार पडला. सात दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. पण सरकारने याकडे लक्ष दिले नाही. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, दोन्ही मृत आहेत. जनतेच्या प्रश्‍नांकडे लक्ष देत नाही. सरकार केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे आज चक्का जाम आंदोलन करण्याची वेळ विदर्भाच्या लोकांवर आली. आताही आमची मागणी पूर्ण नाही केली, तर आम्ही याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन करू, असेही सांगण्यात आले आहे. 

..तर राऊत आणि फडणवीसांना गावबंदी 
आताही वेगळ्या विदर्भासाठी पावले उचलण्यात आली नाहीत, तर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना गावबंदी करण्यात येईल. त्यांना विदर्भात कोठेही फिरू दिले जाणार नाही. फडणवीस भाजपचे नेते आहेत आणि भाजपनेच आम्हाला आश्‍वासन दिले होते. म्हणून आता आम्ही देवेंद्र फडणवीस आणि नितीन राऊत यांच्या विरोधातही आंदोलन छेडणार आहोत, असेही राम नेवले यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in