गडचिरोलीच्या सीमेलगत संशयास्पद कबुतर, सांकेतिक भाषेचे साऊथ इंडिया कनेक्शन... - suspicious pigeons near gadchiroli border south india connection of sign language | Politics Marathi News - Sarkarnama

गडचिरोलीच्या सीमेलगत संशयास्पद कबुतर, सांकेतिक भाषेचे साऊथ इंडिया कनेक्शन...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कबुतरांना प्रशिक्षित करणे तुलनेने सोपे असल्याचे पूर्वापार समजले जाते. ही जप्त केलेली रेसिंग होमर नामक कबूतराची जात वेगवान रीतीने लक्ष्यापर्यंत पोचून परत येण्यासाठी प्रसिद्ध आहे. पोलीस घटनेचा बारकाईने तपास करत आहे.

गडचिरोली : नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत छत्तीसगड राज्यात येत असलेल्या कोंडागाव जिल्ह्याच्या हद्दीत एक संशयास्पद कबुतर आढळले. हे कबुतर पोलिसांनी जप्त केले असले तरी या घटनेने दोन्ही राज्यांत खळबळ उडाली आहे. सध्या हे कबुतर कोंडागाव पोलिसांच्या ताब्यात आहे. कबुतराच्या पायावर दोन रिंग आहेत, त्यांवर सांकेतिक भाषेत काही संदेश आहेत. त्याला उलगडा करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. 

नक्षलवाद्यांकडून संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. नवनवीन तंत्रज्ञनानाचाही वापर केला जातो. पण असा प्राचीन पद्धतीचा वापर केल्याची ही पहिलीच घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनीही कबुतर पकडल्याची पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या कबुतराच्या पायांत सांकेतिक भाषेतील चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या सांकेतिक भाषेचे कनेक्शन साऊथ इंडियाशी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या संवेदनशील भागात खळबळ उडाली असून विविध शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. 

नक्षल्यांकडून कबुतरामार्फत टेहळणी केली जात आहे की यामध्ये कुण्या विदेशी शक्तींचा हात आहे, हे पुढील तपासात स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी गेल्या काही काळात नक्षलविरोधी कारवायांना गती दिली आहे आणि नक्षल्यांवर पोलिसांचा मोठा दबाव आहे. त्यामुळे त्यांनी साथीदारांना संदेश पोहोचवण्यासाठी या प्राचीन पद्धतीचा अवलंब केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कबुतरांना प्रशिक्षित करणे तुलनेने सोपे असल्याचे पूर्वापार समजले जाते. ही जप्त केलेली रेसिंग होमर नामक कबूतराची जात वेगवान रीतीने लक्ष्यापर्यंत पोचून परत येण्यासाठी प्रसिद्ध आहे. पोलीस घटनेचा बारकाईने तपास करत आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री आज कठोर निर्णय घेणार! रात्री जनतेशी संवाद साधणार

कबुतराच्या एका पायात असलेल्या चिठ्ठीवर एईएसव्हीएम टीव्हीएस असे लिहिलेले आहे. ही चिठ्ठी निळ्या रंगाची आहे. तर दुसऱ्या पायातील चिठ्ठी पिवळ्या रंगाची आहे. यावर ६८४५ आयएन १९ असे लिहिलेले आहे. पोलिस या अक्षरांचा आणि आकड्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंतच्या तपासात याचा छडा लागलेला नाही. पण हे कबुतर नेमके कोणत्या जातीचे आहे, हे तपासण्यासाठी पशू विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख