मुख्यमंत्री आज कठोर निर्णय घेणार! रात्री जनतेशी संवाद साधणार - CM Uddhav Thakarey will declare lockdown in state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मुख्यमंत्री आज कठोर निर्णय घेणार! रात्री जनतेशी संवाद साधणार

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असून आज रात्री याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कडक लॅाकडाऊन जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलणार, याबाबतही उत्सुकता लागली आहे. 

राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीचे विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी टास्क फोर्सशी संवाद साधत लॅाकडाऊनबाबत मते जाणून घेतली. बहुतेक सदस्यांनी लॅाकडाऊनला पाठिंबा दिल्याचे समजते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॅाकडाऊनचा आग्रह धरला. 

मुख्यमंत्री दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलून लॅाकडाऊनबाबत सुतोवाच केले आहे. पण लॅाकडाऊनपूर्वी नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंची खरेदी, प्रवासासाठी वेळ आदी मुद्दांवर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते. नागरिकांना लॅाकडाऊनचा त्रास होऊ नये, यादृष्टीने सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यानुसार कोणत्या उपाययोजना राबवायच्या याबाबत बैठकांवर बैठका सुरू आहेत. 

राज्यात 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यानंतर लॅाकडाऊन घोषित केला जाण्याची शक्यता आहे. पण लॅाकडाऊन नेमका किती दिवसांचा असणार, याबाबत संभ्रम आहे. दोन किंवा तीन आठवड्यांचा लॅाकडाऊन लागू शकते, असा अंदाज आहे. आज मुख्यमंत्री याबाबत जनतेशी संवाद साधताना घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या संवादाकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष्य लागले आहे. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केलेल्या मतानुसार, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. राज्यातील क्षणाक्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल, असा इशारा त्यांनी दिला होता.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख