विदर्भात शिवसेनेला भगदाड, आणखी एक नेता शिवबंधन तोडण्याच्या मार्गावर ? - shivsena split in vidarbha another leader on the way to break shivbandhan | Politics Marathi News - Sarkarnama

विदर्भात शिवसेनेला भगदाड, आणखी एक नेता शिवबंधन तोडण्याच्या मार्गावर ?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 14 जुलै 2021

एकंदरीतच आमदार जयस्वाल यांनी पक्षप्रमुखांवर थेट आरोप केले नसले तरी मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे स्पष्टपण जाणवत आहे. आताही त्यांच्याबाबत पक्षाने विचार न केल्यास ते सेना सोडू शकतात, असे त्यांचे समर्थक बोलत आहेत.

नागपूर : शिवसेनेला Shivsena फक्त मुंबई आणि कोकणमध्येच Mumbai and Konkan रस आहे. विदर्भाकडे नेहमी दुर्लक्षच करण्यात आले आहे, असे म्हणत शिवसेनेचे उपनेते, माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा हिंगणगाटचे आमदार राहिलेले अशोक शिंदे Ashok Shinde यांनी कॉंग्रेसच्या Congress हातात हात घालत शिवबंधन तोडले. आता विदर्भातील आणखी एक ज्येष्ठ शिवसैनिक, चार वेळा आमदार झालेले रामटेकचे विद्यमान आमदार आशिष जयस्वालसुद्धा Ashish Jaiswal शिवबंधन तोडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. त्यामुळे विदर्भात शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. 

याबाबत आमदार जयस्वाल यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, अशोक शिंदेंनी कोणत्या कारणामुळे शिवसेना सोडली, ते माहिती नाही. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षात सक्रिय नव्हते. राहिला प्रश्‍न माझ्या नाराजीचा, तर गेल्या अनेक वर्षांपासून मी पक्षाचे काम करत आहो. गेले ३० वर्ष काम केल्यानंतर यावेळी जनतेने मला अपक्ष म्हणून निवडून दिले आहे. निवडून आल्यानंतरही मी शिवसेनेलाच पाठिंबा दिला. मंत्रिमंडळ गठित करताना अनेक अपक्षांना संधी देण्यात आली आणि तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे पक्षनेतृत्व मला न्याय देऊ शकले नाही. पण गेल्या कित्येक वर्षांपासून लोक शिवसेनेचे काम करीत आहेत. त्यामुळे रामटेकला मंत्रिपद मिळावे, ही त्यांची अपेक्षा रास्त आहे. 

शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी आणि हाडाची काडं करून पक्ष मोठा केला आहे. रामटेकला काहीच न मिळाल्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत, हे खरे आहे. मंत्रिपद नसतानाही पक्षाने सोपविलेले प्रत्येक काम मी इमानेइतबारे करीत आहे. आज ना उद्या पक्षश्रेष्ठी मंत्रिपदाची संधी देतील, असा विश्‍वास आहे. आज तीन पक्षांचे सरकार आहे. वर्षानुवर्षे आम्ही ज्यांच्या विरोधात लढलो, त्या पक्षांच्या लोकांना मत्रिपद मिळाली आणि आमचाच मुख्यमंत्री असताना रामटेकला मंत्रिपद नाही, याची खंत कार्यकर्त्यांना आहे. ती असणे स्वाभीविकही आहे, असे आमदार जयस्वाल म्हणाले. 

सध्या विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही. पण भविष्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा आमच्या भागाला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा आहे. विदर्भात शिवसेना थोडी कमजोर आहे, ही बाब आम्ही नाकारत नाही. शिवसैनिकांनी येथून खासदारही निवडून दिलेला आहे. त्यामुळे आता तरी पक्षनेतृत्वाने आम्हाला ताकत द्यावी, जेणेकरून आम्ही विदर्भात पक्ष अजून मोठा करू शकू. १९९५ मध्ये भाजप-शिवसेना युतीची सरकार आली आणि त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा युतीची सत्ता आली. या दोन्ही वेळी पूर्व विदर्भाला मत्रिपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पक्षाचा विस्तार झाला नाही. आता जरी नेतृत्वाने संधी दिली, तर बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना पूर्व विदर्भात उभी करण्यात कुठलीही कसर ठेवणार नाही, असेही आमदार जयस्वाल म्हणाले. 

हेही वाचा : सख्ख्या भावानेच लाटले बहिणीचे २७ कोटी रुपये, बॅंक मॅनेजरही सामील…

एकंदरीतच आमदार जयस्वाल यांनी पक्षप्रमुखांवर थेट आरोप केले नसले तरी मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याचे स्पष्टपण जाणवत आहे. आताही त्यांच्याबाबत पक्षाने विचार न केल्यास ते सेना सोडू शकतात, असे त्यांचे समर्थक बोलत आहेत. त्यामुळे उपनेते राहिलेले अशोक शिंदे यांच्याप्रमाणे जयस्वाल यांनी पक्ष सोडू नये, असे वाटत असल्यास पक्षाने आता त्यांचा विचार केला पाहीजे, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख