संजय राठोडांनी तर राजीनामा दिला, आता किशोर वाघ यांच्यावर कारवाई केव्हा? - sanjay rathore resigned now when will action will be taken against kishor wagh | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोडांनी तर राजीनामा दिला, आता किशोर वाघ यांच्यावर कारवाई केव्हा?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

कुंटे पाटील यांची चित्रा वाघांवर टीका

नागपूर : ७ फेब्रुवारीला रात्री पुजा चव्हाणचा मृत्यू झाला आणि त्यानंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांना भाजपने निशाणा बनवले. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तर राठोडांविरोधात मोर्चा उघडला होता. त्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पण आता चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर कारवाई केव्हा, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे. 

आता भाजपने बोलायला हवे... 
किशोर वाघ हे महात्मा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर असताना 2016 साली एकाला नोकरी लावून देतो, म्हणून तब्बल 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडलं गेलं आणि त्यांना अटक करून निलंबीतही करण्यात आले. 

पतीवर कारवाई होऊ नये आणि त्यांना या प्रकरणातून अलगद बाहेर काढता यावं, म्हणून चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्वतःला व श्री किशोर वाघ यांना शुचिर्भूत करून घेतलं. त्यानंतर त्यांच्यावरील गुन्ह्याचा तपास आपोआप थांबला, तपास का थांबला, कसा थांबला, कुणी थांबवला, हे वेगळं सांगायची गरज नाही. यावर आता भाजपने बोलावे, असेही कुंटे पाटील म्हणाले. 

किशोर वाघ यांच्यावर आज नाही तर १५ दिवसांपूर्वीच म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. बीजेपीच्या हलगर्जीपणामुळे आणि नंतर आलेल्या कोरोनामुळे या कारवाईला उशीर झाला. परंतु पुजा चव्हाण प्रकरणामुळे त्यांच्या पतींवरील कारवाईची तत्परता दाखवण्यात आलेली आहे. हा भाजपा करत असलेला आरोप अत्यंत बालिशपणाचा आहे. पुजाचा मृत्यू ७ फेब्रुवारीला झाला आणि तिच्या मृत्यूनंतर ४-५ दिवसांनंतर माध्यमांनी हे प्रकरण उचलायला सुरूवात केली.

हे सद्धा वाचा : मोठी बातमी : अश्लील सीडीप्रकरणी भाजप मंत्र्याचा राजीनामा

चित्रा वाघ यांनी आत्ता आठ-नऊ दिवसांपूर्वी यामध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. त्याआधीच त्यांच्या पतीवर गुन्हा दाखल केला असल्यामुळे त्यांच्या पतीवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. २०१६ साली फडणवीस सरकारने कारवाई केलेल्या प्रकरणावर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संपूर्ण तपास पूर्ण करून किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला, याचं भारतीय जनता पार्टीने स्वागत केलं पाहिजे, असा टोलाही कुंटे पाटील यांनी हाणला. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख