मोठी बातमी : अश्लील सीडीप्रकरणी भाजप मंत्र्याचा राजीनामा - ramesh jarkiholi caught in a sex cd scandal | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : अश्लील सीडीप्रकरणी भाजप मंत्र्याचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

बेळगाव : कर्नाटकमधील भाजप नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत सापडले होते. त्यांच्या या प्रकरणामुळे कर्नाटकमधील भारतीय जनता पार्टीच्या बी एस येडियुरप्पा सरकारसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. विरोधकांनी यावरून रान उठवलं आहे. दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांवर जारकीहोळी यांचा हा व्हिडिओ दाखविला जात आहे. बेंगलुरू येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 
 
नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की, मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी.

तरुणीला सुरक्षा देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे. दिनेश कलहळ्ळी यांनी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अनैतिक संबंधाची सीडी सार्वजनिक केली आहे. रमेश जरकीहोळी म्हणाले, "हा बनावट व्हिडिओ आहे. त्या महिलेला, आणि तक्रार करणाऱ्यांला मी ओळखत नाही. मी सध्या मैसूर येथे आहे. याबाबत मी पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहे. त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे."  

दरम्यान, रमेश जारकीहोळी यांच्यावर झालेल्या आरोपानंतर बेंगलुरू येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. याबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की मी प्रसारमाध्यमांमध्ये राज्यमंत्री रमेश जारकीहोळी यांचा व्हिडिओ पाहिला आहे. याबाबत मी मुख्यमंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहे. या सीडीची सत्यता पडताळून पाहिली जाईल. त्यानंतर आरोप सिद्ध झाल्यास योग्य की कारवाई करण्यात येईल. 

कोण आहेत रमेश जारकीहोळी

रमेश जारकीहोळी (वय ६०)  हे बेळगावमधील लोकप्रिय मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंबच राजकारणामध्ये सक्रीय आहे. भाजपाच्या येडियुरप्पा सरकारमधील महत्वाचे मंत्री म्हणून जारकीहोळी यांना स्थान आहे. त्यांचे तीन भाऊ हेही कर्नाटकात सक्रीय राजकारणामधील आघाडीचे नेते आहेत. रमेश जारकीहोळी हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. 

रमेश जारकीहोळी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचे 17 आमदार फोडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपला मदत केली. जारकीहोळी यांच्यामुळे जुलै 2019 कर्नाटकात येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं.मुख्यमंत्री होण्याची अनेक वर्षांच्या इच्छेवर या सीडीमुळे पाणी फिरण्याची शक्यता आहे.

Edited  by :  Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख