कोरोनामुळे जनता झाली त्रस्त, अन् सरकार पंढरपुरच्या प्रचारात व्यस्त... - the people were disturbed due to corona and the government is busy in pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनामुळे जनता झाली त्रस्त, अन् सरकार पंढरपुरच्या प्रचारात व्यस्त...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

ज्या प्रकारे सरकारमधले मंत्री हजारोंच्या सभा घेत आहेत, अगदी त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा हजारोंचा मोर्चा काढू. विदर्भाचे आणि नागपूर जिल्ह्याचे वास्तव सरकारसमोर मांडू. मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण आता सरकारचा हा दुजाभाव अजिबात सहन केला जाणार नाही.

नागपूर : महाराष्ट्र आणि विदर्भातील ग्रामीण भागाकडे सरकारच्या एकाही मंत्र्याचे लक्ष नाहीये. इकडे जनता कोरोनाच्या प्रकोपाने त्रस्त असताना सरकारमधले सर्व मंत्री मात्र पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. येवढेच नव्हे तर त्यांच्या प्रचार सभांमधून अनेक जण कोरोनाबाधित होत असतानाही सरकारला त्याचे भान राहिले नसल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि इतरही मंत्री हजारोंच्या सभा घेत आहेत. या सभांमधून कोरोनाचे सुपर स्प्रेडर तयार झाले आहेत. याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. खरं पाहिलं तर अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे. पण सरकारने आयोजकांवर गुन्हे दाखल केले आणि आम्हाला सांगतात की, विरोधी पक्षाने शांत राहा, दोन लोकांपेक्षा जास्त जणांनी आंदोलन करू नका. विरोधी पक्ष म्हणून आम्हीच नाही तर आता जनतासुद्धा चिडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता शेवटचा इशारा आहे की, जर हा अन्याय सुरू राहिला तर ग्रामीण भागातून १० - १० हजार लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. पत्रकार परिषदेला आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये उपस्थित होते. 

ज्या प्रकारे सरकारमधले मंत्री हजारोंच्या सभा घेत आहेत, अगदी त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा हजारोंचा मोर्चा काढू. विदर्भाचे आणि नागपूर जिल्ह्याचे वास्तव सरकारसमोर मांडू. मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर, पण आता सरकारचा हा दुजाभाव अजिबात सहन केला जाणार नाही. ग्रामीण भागातील व्यवस्था बिघडत चालली आहे. त्याला सरकार जबाबदार आहे. आताही वेळ गेलेली नाही. सरकारने आपले मंत्री ग्रामीण भागात पाठवावे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे. एकदा का स्थिती हाताबाहेर गेली, तर मंत्री काय मुख्यमंत्री आले तरीही लोक कुणाचे ऐकणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. 

हेही वाचा : उपराजधानीत आज आणि उद्या कडकडीत बंद, अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास बंदी... 

केंद्र सरकारची टिम सर्व राज्यांत आणि जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहे. पण राज्यातले मंत्री एक तर घरी बसून आहेत, नाही तर पंढरपुरच्या प्रचारात आहेत. विदर्भात एकही मंत्री दिसत नाही. हे चित्र जनता बघत आहे. सरकारने आता अंत बघू नये. ग्रामीण भागातल्या स्थितीत सुधारणा झाली नाही तर आम्ही आता सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.   
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख