आता यवतमाळसारख्या घटना राज्यभर घडतील, जबाबदारी सरकारची असेल... - now incidents like yavatmal will happen all over the state responsibility will be with government | Politics Marathi News - Sarkarnama

आता यवतमाळसारख्या घटना राज्यभर घडतील, जबाबदारी सरकारची असेल...

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 मार्च 2021

सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत अनेक निर्बंध लादले. त्यालाही विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रतिसाद दिला. पण लॉकडाऊन करून लोकांना घरात डांबून वीज कापण्याचे काम सुरू झाले. आता आम्ही शांत बसणार नाही. आता राज्यभर आंदोलन करू. सरकार करून करून करणार काय? गुन्हेच दाखल करतील ना?

नागपूर : कोरोनाचे कारण करून दिवसेंदिवस निर्बंध कडक करीत लोकांना घरात बसविले जात आहे आणि वीज कापण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशा परिस्थितीत कोरोना काळ असूनही लोक रस्त्यांवर उतरू लागले आहे. यवतमाळमध्ये वीज कापायला आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. आता राज्यभर अशा घटना घडतील, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिला. 

सरकारने कोरोनाची नियमावली जाहीर केल्यानंतर आम्ही वीज बिलाविरोधात नियोजित असलेले आमचे जेलभरो आंदोलन पुढे ढकलले. पण यांच्या मंत्र्यांनी मात्र हजारोंची गर्दी जमवली. त्यांच्यावर काहीच कारवाई नाही. पण आम्ही पुढे ढकललेल्या आंदोलनाचा गैरफायदा घेत सरकारने सामान्य ग्राहकांचे आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू केले. हे योग्य नाही. आजच्या आज कनेक्शन कापणे थांबवा आणि कापलेले कनेक्शन पूर्ववत सुरू करा, नाहीतर लोकांचा उद्रेक होईल. मग सरकारला नियंत्रण करणे अवघड होऊन बसेल. आत्ताच शेतकरी रस्त्यांवर येऊ लागले आहेत. कालच बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि मग महावितरणच्या कार्यालयाचीच वीज कापून आंदोलन करण्यात आले. त्यावरून तरी सरकारने बोध घ्यावा आणि तत्काळ लोकांना दिलासा द्यावा, असे बावनकुळे म्हणाले. 

सरकारने कृषी धोरण सुरू केले, थकबाकीदारांना मुभा देत असल्याचे भासवले आणि आता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू केले. ही शुद्ध फसवणूक आहे. एकीकडे लॉकडाऊन करून लोकांना घरांत डांबले जात आहे आणि दुसरीकडे वीज कापली जात आहे. ही सरकारची गुंडागर्दी आहे. आयआयटी टिमने दिलेल्या अहवालात महावितरणने दिलेली वीज बिले चुकीची असल्याचे म्हटले आहे. त्याचीही वसुली पठाणी पद्धतीने केली जात आहे. बिलांमध्ये खासगी सावकारांसारखे दंडव्याज जोडले गेले आहे. जुनी थकबाकी नोटीस न देता वसूल करता येत नाही. पण बिनदिक्कतपणे वसुली सुरू आहे. कायदे, नियम याचे भान सरकारमध्ये कुणाला राहिलेले नाही. हुकूमशाही करून नागरिकांचे अधिकार हिरावून घेतले जात असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला. 

‘सोनू आहे राज्याची शान’, ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल केली जात आहे. ही राज्यातील जनतेची चेष्टा आहे. ज्यांनी कुणी ही क्लिप बनवली आणि व्हायरल केली, त्यांच्यावर सरकारने तत्काळ कारवाई करावी. एकतर चुकीची बिले द्यायची, त्याची पठाणी वसुली करायची आणि वर जनतेचीच चेष्टा करायचा अधिकार यांना कुणी दिला, असा प्रश्‍न बावनकुळे यांनी उपस्थित केला. 

हेही वाचा : दिल्लीत वीजबिल माफ मग महाराष्ट्रात का नाही; वीज कनेक्शन तोडल्यास संघर्ष अटळ

यापुढे सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद नाही
सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत अनेक निर्बंध लादले. त्यालाही विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रतिसाद दिला. पण लॉकडाऊन करून लोकांना घरात डांबून वीज कापण्याचे काम सुरू झाले. आता आम्ही शांत बसणार नाही. आता राज्यभर आंदोलन करू. सरकार करून करून करणार काय? गुन्हेच दाखल करतील ना, आम्ही गुन्ह्यांना घाबरत नाही. आता वीज कनेक्शन कापण्याच्या कारवाईच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलप्रभावित असलेल्या कोरपना या गावाचीही वीज कापण्यात आली आहे. आता लोकांमधला संयम सुटत चालला आहे. यवतमाळमध्ये वीज कापायला आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोकांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. सरकारसाठी हे ट्रेलर आहे. यावरूनच काय ते समजावे आणि वीज कनेक्शन कापण्याची कारवाई थांबवावी, अन्यथा लवकरच राज्यभरात हीच स्थिती बघायला मिळणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख