कोविड हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत चार ठार, मोदींनी व्यक्त केले दुःख - modi express grief over four deaths in short circuit fire at covid hospital | Politics Marathi News - Sarkarnama

कोविड हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत चार ठार, मोदींनी व्यक्त केले दुःख

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 10 एप्रिल 2021

अतिदक्षता कक्षातून आग लागल्यानंतर धूर बाहेर पडल्यानंतर एकच धावपळ उडाली. याच कक्षात भरती असलेल्या चार जणांना गुदमरल्याने मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच वाडी व एमआयडीसी केंद्राचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. त्यापाठोपाठ तीन फायर टेंडरसह आपत्कालीन सेवा पथकासह टीटीएलही दाखल झाले.

नागपूर : आयुर्वेद तज्ज्ञ असलेले डॉ. राहुल ठवरे यांच्या अमरावती मार्गावरील वेलट्रीट रुग्णालयात काल रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या कोविड हॉस्पिटलच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या अतिदक्षता कक्षात प्रथम आग लागली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. 

या घटनेवर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘नागपूर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीचे वृत्त ऐकून दुःख झाले. ज्यांनी या दुर्घटनेत जीव गमावला, त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो.’ आग लागल्यानंतर इतर रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने त्यांचे जीव वाचले. रुग्णालयाच्या दुसऱ्या माळ्यावर असलेल्या अतिदक्षता कक्षातून ही आग पसरली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मृतकांत एक महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. तीन मृतदेह मेडिकलला रवाना करण्यात आले. तर, या रुग्णालयातील इतर रुग्णांना रात्रीच मेयो, मेडिकलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले.  

चार माळयांच्या या रुग्णालय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर मेथोडेक्स सिस्टम प्रा. लिमिटेडचे कार्यालय आहे. तर, तळमजल्यावर आयसीआसीआय बॅंकेचे कार्यालय आहे. दोन ते चार माळ्यावर रुग्णालय आहे. दुसऱ्या माळ्यावर अतिदक्षता कक्ष आहे. येथे १६ खाटांची व्यवस्था आहे. या कक्षातील वातानुकूलित यंत्राला आग लागली. त्यानंतर ती पसरत गेली. आग लागल्याचे दिसताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी फायर एक्स्टींग्वीशरने आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढतच गेली. या माळ्यावर एकूण १० रुग्ण भरती होते. यातील सहा रुग्ण स्वत:च रुग्णालयाबाहेर आले तर, उर्वरित ४ रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तिसऱ्या माळ्यावर १७ खाटा होत्या. येथील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आले. तर, चौथ्या माळ्यावर साधारण कक्ष होता. येथे ५ रुग्ण आणि एक कर्मचारी होता. हे सर्व सुखरूप बाहेर पडले. 

अतिदक्षता कक्षातून आग लागल्यानंतर धूर बाहेर पडल्यानंतर एकच धावपळ उडाली. याच कक्षात भरती असलेल्या चार जणांना गुदमरल्याने मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच वाडी व एमआयडीसी केंद्राचा एक बंब घटनास्थळी रवाना झाला. त्यापाठोपाठ तीन फायर टेंडरसह आपत्कालीन सेवा पथकासह टीटीएलही दाखल झाले. घटनास्थळावर सर्वप्रथम वाडी नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे पोहोचले. पाठोपाठ पोहोचलेल्या अग्निशमन बंब व कर्मचाऱ्यांनी आग विझविली. तोवर चार निष्पापांचा बळी गेला होता. तर, इतर रुग्णांचाही या आगीमुळे गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावली. 

हेही वाचा : अखेर संजय पांडेंना मिळाला न्याय; प्रभारी का होईना झाले राज्याचे डीजीपी

त्यांना तातडीने मेयो व मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळावर मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, स्थानिक अधिकारी तुषार बारहाते, फायरमन शरद दांडेकर, रूपेश मानके, शालीक कोठे, चालक शेंबेकर, सुनील डोंगरे आदींनी धाव घेत बचाव कार्यात मदत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रुग्ण व जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आमदार समीर मेघे यांनी रूग्णांना मदत करण्याचे निदेंश दिले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनाही फडणवीस यांनी आवश्यक त्या सूचना केलेल्या आहेत.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख