अखेर संजय पांडेंना मिळाला न्याय; प्रभारी का होईना झाले राज्याचे डीजीपी - senior ips officer sanjay pande appointed as interim dgp | Politics Marathi News - Sarkarnama

अखेर संजय पांडेंना मिळाला न्याय; प्रभारी का होईना झाले राज्याचे डीजीपी

उत्तम कुटे
शनिवार, 10 एप्रिल 2021

संपूर्ण सेवाकाळात महत्त्वाच्या पदांवर डावलले गेलेले पांडे अखेर राज्याचे पोलिस महासंचालक झाले आहेत. 
 

पिंपरी : सेवाकाळात अनेकदा महत्त्वाच्या पदांवर डावलले गेलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर न्याय मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांची प्रभारी पोलिस महासंचालक (डीजीपी) म्हणून नेमणूक केली. याबाबतचा आदेश काल (ता.९) रात्री उशिरा गृह विभागाने काढला. 

दरम्यान,पांडेंना न्याय मिळाला असला तरी राज्याला, मात्र  कायमस्वरूपी डीजीपी मिळालेले नाहीत. गेल्या तीन महिन्यांत राज्याला लाभलेले पांडे हे तिसरे हंगामी पोलीस प्रमुख आहेत. सध्या मुंबईचे पोलिस आयुक्त असलेले हेमंत नगराळे हे या पदावर येण्यापूर्वी त्यांच्याकडे डीजीपी पदाची अतिरिक्त जबाबदारी होती. मात्र, गेल्या महिन्यात वाझे प्रकरणामुळे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी पातळीवर खांदेपालट झाला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांची उचलबांगडी होमगार्ड महासंचालक म्हणून केली गेली. त्यांच्या जागी नगराळे आले तर, नगराळेंची अतिरिक्त डीजीपी पदाची जबाबदारी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे म्हणजे एसीबीचे महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे देण्यात आली होती. 

आता राज्याच्या पोलिस प्रमुखपदाची अतिरिक्त जबाबदारी पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. ते राज्यातील सर्वांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. तसेच, स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. 

राजकीय वरदहस्त नसल्याने आतापर्यंतच्या सेवाकाळात त्यांना महत्त्वाच्या अशा फिल्ड पोस्टिंगवर अनेकदा डावलण्यात आले. गेल्या महिन्यात त्याची पुनरावृत्ती झाली होती. अगोदरच ते होमगार्ड महासंचालक या कमी महत्त्वाच्या पदावर होते. मात्र,वाझे प्रकरणातून परमबीरसिंह यांना होमगार्ड महासंचालक केले गेले. तर,तर पांडे यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक करण्यात आले होते.  त्यामुळे नाराज होऊन त्यांनी  १८ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपण राज्यात सर्वात ज्येष्ठ असूनही कसे डावलले जात आहोत याची कैफियत मांडली होती. 

पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना डावलून त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी कनिष्ठ असलेल्या १९८८ च्या बॅचचे आयपीएस रजनीश शेठ यांच्याकडे डीजीपीपदाची अतिरिक्त जबाबदारी गेल्या महिन्यात राज्य सरकारने सोपवली होती. त्याआधीही पांडे यांना डावलण्यात येऊन त्यांच्यापेक्षा एका वर्षाने कनिष्ठ असलेले १९८७ च्या बॅचचे आयपीएस नगराळेंना राज्याचे प्रभारी पोलिस महासंचालक करण्यात आले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख