यवतमाळच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी ललितकुमार वऱ्हाडेच कायम - lalitkumar warhade remains of the residential deputy collector of yavatmal | Politics Marathi News - Sarkarnama

यवतमाळच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी ललितकुमार वऱ्हाडेच कायम

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

ललितकुमार वऱ्हाडे यांनाच निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. तर हिंगोले हे मोर्शी येथे उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत असतील, असे आदेशात म्हटले आहे. 

यवतमाळ : निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांची १ ऑक्टोबर २०२० रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. सदर बदली अन्यायकारक असून सूडभावनेतून करण्यात आल्याची चर्चा त्यावेळी महसूल प्रशासनात रंगली होती. राजकीय हेतूने ही बदली करण्यात आल्याचे सामान्य नागरिकांचे म्हणणे होते. न्यायाधिकरणाने त्यांना यवतमाळच्या उपजिल्हाधिकारीपदी कायम ठेवले आहे. 

या बदलीविरोधात वऱ्हाडे यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. तेव्हा न्यायाधिकरणाने त्यांची बदली रोखली होती. त्यावर महसूल व वनविभागाने आदेश काढून ललितकुमार वऱ्हाडे यांना यवतमाळ येथेच निवासी उपजिल्हाधिकारीपदी कायम ठेवले आहे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला अखेर शासनानेही न्याय दिल्याची भावना या आदेशामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. ‘सरकारनामा’ने तेव्हा या सर्व घडामोडींबाबत वृत्तमालिका चालवली होती. 

‘कोवीड-१९’च्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर २०२०-२१ मध्ये बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांना यवतमाळ येथे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली होती. या आदेशाविरुद्ध निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. त्यावर न्यायालयाने रोक लावत वऱ्हाडे यांनाच उपजिल्हाधिकारी या पदावर कायम ठेवले होते. 

हेही वाचा : राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ द्या - शरद पवारांचे जनतेला आवाहन

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने सोमवारी (ता. पाच) काढलेल्या आदेशानुसार नितीनकुमार हिंगोले यांचे १ ऑक्टोबर २०२० च्या शासन आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ या पदावर काढण्यात आलेले पदस्थापनेचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्‍यांच्या मान्यतेने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ललितकुमार वऱ्हाडे यांनाच निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. तर हिंगोले हे मोर्शी येथे उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत असतील, असे आदेशात म्हटले आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख