गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘त्या’ काळात मी नागपुरात कोरोनावर उपचार घेत होतो...   - home minister deshmukh said at that time i was undergoing treatment of corona in nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री देशमुख म्हणाले, ‘त्या’ काळात मी नागपुरात कोरोनावर उपचार घेत होतो...  

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 मार्च 2021

१५ फेब्रुवारीला गृहमंत्र्यांना सुटी होणार असल्यामुळे काही माध्यमांचे प्रतिनिधी ॲलेक्सीस हॉस्पिटलमध्ये त्यांचा बाइट घेण्यासाठी गेले. सोशल डिस्टंसिंग पाळले गेले पाहिजे, म्हणून टेबल लावण्याची व्यवस्थाही पत्रकारांनीच केली. देशमुखांनी स्वतः पत्रकार परिषद आयोजित केली नव्हती.

नागपूर : ५ ते १५ फेब्रुवारी या काळात मी नागपुरातील अॅलेक्सीस हॉस्पीटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होतो. १५ फेब्रुवारीला मला सुटी झाली. मी हॉस्पीटलमधून बाहेर निघत होतो, तेव्हा तेथे पत्रकार आलेले होते. त्यांना मला काही प्रश्न विचारायचे होते. त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि त्यानंतर तेथून निघून गेलो. १५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी गृहविलगीकरणामध्ये होतो. २८ फेब्रुवारीला मी घराच्या बाहेर पडलो आणि मुंबईतील सह्यांद्री गेस्टहाऊसमध्ये बैठकीला गेलो, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आत्ता पाठवलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला सचिन वाझे यांना हॉटेल आणि रेस्टॉरंटकडून पैसे वसूल करण्यासाठी सांगितल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून केला आहे. मात्र त्या दिवशी नागपुरातील ॲलेक्सीस हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेतल्यानंतर देशमुखांना सुटी झाली होती. त्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नाही, तर काही माध्यमांचे प्रतिनिधी ‘बाईट’ घेण्यासाठी ॲलेक्सीस हॉस्पिटलमध्ये गेले होते. सोशल डिस्टंसिंग पाळले गेले पाहिजे, म्हणून टेबल लावण्याची व्यवस्थाही पत्रकारांनीच केली. 

देशमुखांनी स्वतः पत्रकार परिषद आयोजित केली नव्हती. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यातील हवा निघून गेली असल्याचे देशमुख यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. कोरोना रुग्ण असताना गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलीच कशी, असा प्रश्‍न फडणवीसांनी उपस्थित केला होता. ॲलेक्सीस हॉस्पिटलमध्ये पत्रकारांशी बातचीत केल्यानंतर देशमुख नागपुरातल्या घरीसुद्धा गेले नाही. येथून त्यांना तडक विमानतळ गाठले आणि मुंबई गाठली. तेथे जाऊन मग ते गृहविलगीकरणात गेले. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या या आरोपात तथ्य नसल्याचेही सांगण्यात आले आहे. 

सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या परमबीर सिंग यांनी त्यांच्याकडे सोपवलेला पदभार न स्वीकारता रजेवर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. याबाबत परमबीर सिंग यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. यामध्ये सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. मात्र, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत केलेला एका दाव्यावर नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण होते. 

हेही वाचा : मुख्यमंत्री ठाकरे आज घेणार महत्वाची बैठक; राजकीय घडामोडींना वेग

परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावले. मात्र, ज्या दिवशी वाझेंना भेटायला बोलावल्याचा दावा त्यांनी केला आहे, त्याच काळात गृहमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते उपचार घेत होते. त्यावेळी त्यांना बोलण्यास त्रास होत असल्याचे त्यांच्या वैद्यकीय अहवालातून दिसून येते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या दाव्याबाबत या कागदपत्रांवरील माहिती खरी की खोटी, हाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे.   
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख