बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले १५००, घरेलू कामगारांनाही मदत देणार... - fifteen hundred deposited in account of construction worker will also help domestic workers | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले १५००, घरेलू कामगारांनाही मदत देणार...

चंद्रशेखर महाजन
सोमवार, 3 मे 2021

बांधकाम कामगारांच्या खात्यात राज्य शासनाने प्रत्येकी १५०० रुपये जमा केले असून अशी योजना राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. घरेलू कामगारांना देखील राज्य शासन आर्थिक मदत करणार.

नागपूर : देशासाठी शेतकरी जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा कामगार आहे. कामगारांनी हात थांबवले की, देशही ठप्प होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार कामगारांची सर्वतोपरी काळजी घेत आहे. नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात राज्य शासनाने प्रत्येकी १५०० रुपये जमा केले असून अशी योजना राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. घरेलू कामगारांना देखील राज्य शासन आर्थिक मदत करणार असल्याचे माहिती कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. 

महाराष्ट्र दिन आणि कामगार कामगार दिनानिमित्त श्रमकल्याण युग मासिकाचे प्रकाशन आणि १० वी व १२ वी च्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त ११२ कामगार पाल्यांचा गुणगौरव सोहळा ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. यावेळी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू बोलत होते. बच्चू कडू म्हणाले की, देशासाठी शेतकरी जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढेच महत्त्वाचे कामगार आहेत. कामगारांचे हात ज्या दिवशी थांबतील, त्या दिवशी संपूर्ण देश ठप्प होऊ शकतो. या कामगारांना त्यांच्या श्रमाची प्रतिष्ठा मिळायला हवी. त्यादृष्टीने शासन योजना आखत आहे. 

कार्यक्रमाला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता सिंघल यांच्या हस्ते मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार उपसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोडबोले, मीडिया आर अँड डी.चे संचालक दिलीप कवळी, सुप्रसिद्ध करिअर काऊंसिलर स्वाती साळुंखे आदी मान्यवर यावेळी ऑनलाइन उपस्थित होते. 

हेही वाचा : तर पूनावालांना धमकी देणाऱ्यांवर आम्ही कारवाई करु; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची भूमिका

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि फेसबुकवर करण्यात आले. कामगार मंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोरोना काळात शासन कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कामगारांना कामावरून कमी न करण्याबाबत उद्योगांना आवाहन करण्यात आले आहे. कामगारांना मोफत शिवभोजन थाळी आणि जीवनावश्यक वस्तू पुरविणे, प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. संचालन सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी मनोज बागले यांनी मानले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख