फडणविसांनी रुपयाही दिला नाही; पण ठाकरे सरकारने पूर्ण केली त्यांची घोषणा... - fadanvis did not pay a single rupee but the thackeray government fulfill their announcement | Politics Marathi News - Sarkarnama

फडणविसांनी रुपयाही दिला नाही; पण ठाकरे सरकारने पूर्ण केली त्यांची घोषणा...

केवल जीवनतारे 
सोमवार, 29 मार्च 2021

विद्यमान राज्य सरकारने १०० कोटीतील पहिला १५ कोटीचा निधी सुपरच्या तिजोरीत जमा केला आहे. यातून खरेदी करण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचे नियोजन अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह इतर अधिकारी करणार असल्याची माहिती आहे. 

नागपूर : नागपूरचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे गरीब रुग्णांसाठी वरदान आहे. येथे हृदय, किडणीसह पोटाच्या आणि मेंदूच्या विकारांवर उपचार केले जातात. या हॉस्पिटलच्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटींची घोषणा २०१७ मध्ये फडणवीस सरकारने केली होती. मात्र त्यांनी दोन वर्षांत कवडीही सुपरला दिली नाही आणि ‘सुपर’ला वाऱ्यावर सोडले. पण महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने फडणवीसांची ती घोषणा पूर्ण केली आणि १५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता सुपरच्या तिजोरीत जमा केला आहे. 

तत्कालीन फडणवीस सरकारने मेडिकल, सुपर आणि मेयोच्या विकासासाठी घोषणांचा पाऊस पाडला. मात्र यातील एकही घोषणा पूर्ण केली नाही. १०० कोटीपैकी पहिल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये २० कोटी आणि २०१९ मध्ये २० कोटी देण्यात येतील, असे म्हटले होते. २०१७ ते २०१९ या कालावधीत ४० कोटी तत्कालीन भाजप सरकारने देणे अपेक्षित होते, परंतु एक रुपयाही दिला नाही. पहिल्या टप्प्यातील निधीतून सुपरच्या प्रत्येक विभागांत पाच खाटांचा अतिदक्षता विभाग उभारण्यात येईल. अशाप्रकारे सात विभागांत एकूण ३५ खाटांचे अतिदक्षता विभाग तयार होणार होते. 

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ‘सरकारनामा’ने सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटीची घोषणा हवेत असे वृत्त प्रकाशित केले. यानंतर पाठपुरावा करीत सुपरच्या ३५ खाटांचा अतिदक्षता विभाग १०० कोटीअभावी कागदावरच असे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत विद्यमान राज्य सरकारने १०० कोटीतील पहिला १५ कोटीचा निधी सुपरच्या तिजोरीत जमा केला आहे. यातून खरेदी करण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीचे नियोजन अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासह इतर अधिकारी करणार असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : सावकाराला धमकावणे भोवले, अजनीच्या ठाणेदारावर गुन्हा दाखल...

सुपर स्पेशालिटीत दिवसाला पाचशेवर रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. येथे उभारलेले किडणी प्रत्यारोपण केंद्र गरिबांसाठी वरदान ठरले आहे. आतापर्यंत सुमारे ६० रुग्णांवर किडणी प्रत्यारोपण झाले. सुपरच्या विकासासाठी सरकारने १५ कोटींचा निधी दिला आहे. यातून रुग्ण हित लक्षात घेत विविध यंत्रासह आवश्यक बाबींवर खर्च करण्यात येतील. जेणेकरून याचा लाभ गरीब रुग्णांना मिळेल. 
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल-सुपर.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख