सावकाराला धमकावणे भोवले, अजनीच्या ठाणेदारावर गुन्हा दाखल... - a case has been registered against ajnis senior police inspector | Politics Marathi News - Sarkarnama

सावकाराला धमकावणे भोवले, अजनीच्या ठाणेदारावर गुन्हा दाखल...

अनिल कांबळे
सोमवार, 29 मार्च 2021

त्याप्रकरणी ११ मार्च २०२० ला विनोद चौधरी याने राजा यांना अवैधपणे ताब्यात घेऊन मारहाण केली. तसेच आपल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि खंडणी मागितली. या प्रकरणी राजा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई झाली नाही. 

नागपूर : शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरीसोबत असलेल्या मैत्रीचा फायदा घेत मोहम्मद अशफाक अली याने विनोदच्या मदतीने सावकार राजा जमशेद शरीफ यांना धमकावले. मित्राला मदत करण्यासाठी ठाणेदार चौधरीने शरीफ यांना गुन्हे शाखेत बोलावून मारहाण केली आणि खंडणी मागितली. शरीफ यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तेथेही न्याय न मिळाल्याने मग त्यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून ठाणेदार चौधरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चौधरीने शरीफ यांना खंडणीची मागणी करताना गळ्यातील सोनसाखळी हिसकण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी पीआय विनोद चौधरीसह दोघांविरुद्ध खंडणीसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा जमशेद शरीफ (२८, रा. अनंतनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. राजा शरीफ यांनी आरोपी मोहम्मद अशफाक अली याला बांधकामासाठी पैशाची गरज असताना २०१९ मध्ये वेगवेगळ्या तारखेला १० लाखांपेक्षा अधिक रक्कम दिली होती. त्यावेळी त्यांनी हमी म्हणून एका मुद्रांक शुल्कावर अंगठा व दोन धनादेश स्वाक्षरी करून दिले होते. मार्च २०२० मध्ये त्याला राजा यांनी व्याजासह मूळ रकमेची मागणी केली. अशफाक अली याचे गुन्हे शाखा परिमंडळ ३ चे तत्कालीन प्रमुख पोलिस निरीक्षक विनोद चौधरी याच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे अशफाक अलीने पीआय विनोद चौधरी याची भेट घेतली. राजा यांच्याबाबत तक्रार केली. 

त्याप्रकरणी ११ मार्च २०२० ला विनोद चौधरी याने राजा यांना अवैधपणे ताब्यात घेऊन मारहाण केली. तसेच आपल्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि खंडणी मागितली. या प्रकरणी राजा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खासगी तक्रार करून संबंधितांविरुद्ध कारवाईची मागणी केली. त्यांच्या तक्रारीवर न्यायदंडाधिकारी व्ही. एम. देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी होऊन न्यायालयाने चौधरी व अली यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ व ३८४ कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लकडगंज पोलिसांनी पीआय विनोद चौधरी आणि अशफाक अलीवर खंडणीसह अन्य गुन्हे दाखल केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख