राजकीय वैमनस्यातून केला दुर्योधन रायपुरेंचा खून, दिली होती ५ लाखांची सुपारी...

मुख्य आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे आहे. त्यानेच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे आता समोर आले आहे. दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्यास होते.
राजकीय वैमनस्यातून केला दुर्योधन रायपुरेंचा खून, दिली होती ५ लाखांची सुपारी...
Murder

गडचिरोली : शहरातील बहुचर्चित रहस्यमय दुर्योधन रायपुरे Duryodhan Raypure यांच्या हत्या प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले  Gadchiroli police's success असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी व मास्टर माइंड गडचिरोली नगर परिषदेचे वित्त व नियोजन सभापती तथा फुले वॉर्डाचे नगरसेवक प्रशांत खोब्रागडेला (वय 50) अटक केली आहे. Police arrested Prashant Khobragade या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.

23 जून रोजी रात्री फुले वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला हे प्रकरण बरेच रहस्यमय झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाहून प्रशिक्षित श्वान पथकासह आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण, आरमोरी मार्गावरील तलावापर्यंत पोहोचून श्वान थांबले होते. त्यामुळे दुर्योधन रायपुरे (48) हत्या प्रकरणाचे रहस्य अधिकच गडद झाले होते. पण, पोलिसांनी शिताफीने आणि वेगाने तपासचक्रे फिरवून गोंदिया येथून घटनेच्या दहाव्या दिवशी 3 जुलै रोजी अमन काळसर्पे (18) याला अटक केली. न्यायालयात हजर करून त्याची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवताच आरोपी काळसर्पे पोपटासारखा बोलू लागला. त्यातूनच उर्वरित आरोपी प्रसन्ना रेड्डी (24), अविनाश मत्ते (वय 26), धनंजय उके (वय 31) या तिघांना अटक करण्यात आली. 

या चौघांना 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केल्यावर या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नगर परिषदेचा वित्त व नियोजन सभापती प्रशांत खोब्रागडे असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री 8 वाजता अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. मृत दुर्योधन रायपुरे आपल्या विविध सामाजिक कार्यांमुळे परिसरात सर्वपरिचित होते. त्यांनी डिसेंबर 2016 मध्ये नगर परिषदेची निवडणूक फुले वॉर्डातून प्रशांत खोब्रागडेच्या विरोधात लढली व अतिशय कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे हे हत्याकांड राजकीय वैमनस्यातून घडले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. 

या प्रकरणात देसाईगंज येथील काँग्रेसचा एक नेता सहभागी असल्याची चर्चा आहे. पण, पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही. पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गादर्शनात व पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम, पोलिस हवालदार गणेश कांबळे, नायक पोलिस धनंजय चौधरी यांनी या रहस्यमय हत्याकांडाचा उलगडा केला. याप्रकरणी त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रांत भुसारी, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक गावंडे, सहायक पोलिस निरीक्षक सबने, पोलिस हवालदार नरेश सहारे, पोलिस शिपाई माणिक दुधबळे यांचे सहकार्य मिळाले.

मोबाईलने मिळाला मार्ग....
या रहस्यमय हत्याकांडामागील हत्याऱ्यांचे धागेदोरे सुरुवातीला गवसत नव्हते. आरोपींनी अतिशय सराईतपणे हत्या करून पोबारा केला होता. पण, घटनास्थळी तपास करताना मृत दुर्योधन रायपुरे यांचा मोबाईल तिथे नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्या मोबाईलचा क्रमांक व इतर माहिती पोलिसांच्या सायबर शाखेला दिली. हा मोबाईल या प्रकरणी पकडण्यात आलेला पहिला आरोपी अमन काळसर्पे याच्याकडे होता. त्याने तो मोबाईल सुरू करताच सायबर शाखेला त्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी लगेच गोंदिया कूच करत अमनला ताब्यात घेतले. त्यातून पुढे सगळा घटनाक्रम, उर्वरित आरोपी व मुख्य सूत्रधार प्रशांत खोब्रागडेला अटक करणे पोलिसांना शक्य झाले.

५ लाखांची सुपारी
मुख्य आरोपी गडचिरोली नगर परिषदेचा सभापती प्रशांत खोब्रागडे आहे. त्यानेच राजकीय वैमनस्यातून दुर्योधन रायपुरे यांची हत्या करण्यासाठी पाच लाखांची सुपारी दिल्याचे आता समोर आले आहे. दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहरातील फुले वॉर्डात वास्तव्यास होते.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in