दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला दोन दिवसांची पोलिस कोठडी... - deepali chavan suicide case shriniwas reddi remanded in police custody for two days | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : श्रीनिवास रेड्डीला दोन दिवसांची पोलिस कोठडी...

अरुण जोशी 
गुरुवार, 29 एप्रिल 2021

न्यायाधीशांनी प्रथम आरोपीची कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले एंटीजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, तर आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट ३ दिवसांनंतर येणार आहे. त्यानंतर धारणी पोलिसांनी आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अखेर काल नागपुरातून अटक करण्यात आली. दिपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सहआरोपी श्रीनिवास रेड्डीला धारणी न्यायालयात आज दुपारी हजर केले असता रेड्डीला २ दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते. काल २८ एप्रिल रोजी रेड्डीचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल झाली. यानंतर पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आले आणि त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली. त्यानंतर रेड्डीला धारणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आज सकाळी त्याची आत्महत्या प्रकरणात चौकशी धारणी पोलिसांनी केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास धारणीच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. 

न्यायाधीशांनी प्रथम आरोपीची कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले एंटीजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे, तर आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट ३ दिवसांनंतर येणार आहे. त्यानंतर धारणी पोलिसांनी आरोपीला ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी तपास अधिकारी पूनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, एपीआय देवेंद्र ठाकूर, पीएसआय मंगेश भोयर, अरविंद सरोदे, सचिन होले, विलास पटोकार, वसंत चव्हाण, पाठक यांच्यासह पोलिसांचे पथक तैनात होते. सरकारी पक्षाच्या वतीने भारत भगत यांनी काम पहिले तर आरोपी रेड्डी कडून वकील मनीष जैसवानी, दीपक वाधवानी यांनी काम पाहिले.

हेही वाचा : खासदार राजीव सातव व्हेंटिलेटरवर असून प्रकृती स्थिर : विश्वजीत कदम 

महिनाभरापूर्वी श्रीनिवास रेड्डींचे निलंबन
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर डीएफओ विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून तात्काळ अटक करण्यात आली. तसेच त्यांचे निलंबनही करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख