कॉंग्रेसचे राज्य प्रभारी पाटील म्हणाले, किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्या... - congress state in charge said take review of the same implementation program | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसचे राज्य प्रभारी पाटील म्हणाले, किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्या...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

एच. के. पाटील आणि कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना त्याची माहिती दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत अजूनही सर्व काही आलबेल नसल्याचा विरोधकांचा जो आरोप होतो आहे, त्यामध्ये तथ्य असल्याचे मानले जात आहे.

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील कोरोनाची सद्यःस्थिती व उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा केली. याबरोबरच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातही सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. 

निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत, ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा : लॉकडाऊनच्या तयारीतही मुख्यमंत्र्यांनी नांदुरा नगराध्यक्षांना बांधले शिवबंधन

एच. के. पाटील आणि कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना त्याची माहिती दिली. त्यामुळे महाविकास आघाडीत अजूनही सर्व काही आलबेल नसल्याचा विरोधकांचा जो आरोप होतो आहे, त्यामध्ये तथ्य असल्याचे मानले जात आहे. निधी वाटपावरून बऱ्याच नेत्यांनी आजवर ओरड केली आहे. सर्व निधी पुणे जिल्ह्याच्या जवळपास नेल्याचाही आरोप मागे करण्यात आला होता. विदर्भातील कॉंग्रेसच्या मंत्र्‍यांनाही डीपीसीसाठी निधी खेचून आणावा लागला होता. म्हणूनच एच. के. पाटील यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली असल्याचेही सांगितले जात आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख