लॉकडाऊनच्या तयारीतही मुख्यमंत्र्यांनी नांदुरा नगराध्यक्षांना बांधले शिवबंधन

अगोदर भाजप पक्ष प्रवेशावेळी रजनीताई जवरे यांनी मुंबई गाठून त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतील प्रवेश हा रात्रीचाच झाल्याची पण चर्चा सध्या होत आहे. मलकापूर मतदारसंघातील नांदुरा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नांदुरा (जि. बुलडाणा) ः लॉकडाऊनची तयारी सरकारने सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. शुक्रवारी जनतेला संबोधित करण्याआधी त्यांनी एक राजकीय कार्यक्रमही उरकून घेतला. तो म्हणजे नांदुऱ्याच्या नगराध्यक्षांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा. स्थानिक नगरविकास आघाडीकडून राखीव असलेल्या मतदारसंघातून नगराध्यक्षपदी जनतेतून विराजमान झालेल्या नांदुऱ्याच्या नगराध्यक्ष रजनी जवरे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक शिवसेना नेतृत्वाला बगल देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व्हाया खान्देश मार्गे हा प्रवेश झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. 

येथील नगराध्यक्षपदाचे एक वर्ष शिल्लक असताना व या पदासाठी अविश्वास ठरावाची टांगती तलवार डोक्यावर असताना हा सोयीचा प्रवेश झाल्याची चर्चा रंगली आहे. चार वर्षांपूर्वी जनतेतून संपन्न झालेल्या नांदुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत राखीव पदासाठी आमदार एकडे प्रणीत नगरविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदी विराजमान झालेल्या रजनी जवरे यांचा राजकीय प्रवास हा गेल्या चार वर्षात अस्थिर असाच पहावयास मिळाला. सुरुवातीला नगराध्यक्षपदाचा काही कार्यकाळ होत नाही तोच रजनी जवरे यांनी स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नगरविकास आघाडीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर स्थानिक नगरविकास आघाडीने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. 

नंतर मात्र आमदार संचेती यांचा पराभव झाल्याने व मतदारसंघाचे नेतृत्व आमदार राजेश एकडे यांच्याकडे जाण्यासोबतच राज्यातही महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने नगराध्यक्ष पद धोक्यात येते की काय, अशी अवस्था असताना रजनीताई जवरे यांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाला अंधारात ठेवत खान्देशचा शिवसेना युवा नेतृत्वाला हाताशी धरून व्हाया नगरविकास मंत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास करत हातात शिवबंधन बांधल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

विशेष म्हणजे अगोदर भाजप पक्ष प्रवेशावेळी रजनीताई जवरे यांनी मुंबई गाठून त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतील प्रवेश हा रात्रीचाच झाल्याची पण चर्चा सध्या होत आहे. मलकापूर मतदारसंघातील नांदुरा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पहिलेच या तालुक्यात शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यातच नगराध्यक्ष जवरे यांचा पक्षप्रवेश तिसऱ्या गटाची नांदी ठरणार की या जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे सर्वांना एका ठिकाणी बसवून पक्षाची मोट मजबूत करणार, हे येणारा काळच ठरवेल.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com