वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रजेचा योगायोग, अन् पदाधिकाऱ्यांची चलबिचल...

रजेवरील बहुतेक अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आहे. त्यामुळे कौटुंबिक कारणांमुळे रजेवर आहे की अन्य याची पुष्टी होऊ शकली नाही. त्यातच साहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक यांचे लग्न असल्याने तेही रजेवर गेले आहे.
Chandreapur Municipal Corporation
Chandreapur Municipal Corporation

चंद्रपूर : कोणत्याही कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रजा घेणे ही बाब काही नवीन नाही. वरिष्ठ असो की कनिष्ठ कुणीही रजा घेतली, तर त्याची चर्चाही होत नाही. पण सध्या महानगरपालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या रजा चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारणही तसेच आहे. महानगरपालिका आयुक्तांसह ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकाच वेळी, एकाच नमुन्यात रजेचा अर्ज दिला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. At the same time 7 senior officers including municipal commissioner applied for leaves. 

दोन दिवसांचा रजेचा अर्ज, त्याला लागून येणारा दुसरा शनिवार आणि हक्काच्या रविवारची रजा, अशी एकूण चार दिवसांची मोठी 'विश्रांती' चंद्रपूर महानगर पालिकेच्या आयुक्तांसह त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून मनपाचे काम जवळपास ठप्पच पडले आहे. एकाच वेळी एवढ्या संख्येत अधिकाऱ्यांनी रजा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे एकत्र रजा घेण्याचा हा योगायोग आहे की पिकनिकचा बेत, याबाबतच्या चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये रंगल्या आहे. 

शासकीय अधिकाऱ्यांनी हक्काच्या रजा घेणे याबाबत कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. वैयक्तिक कारण, आजारपण यात अधिकारी कर्मचारी नेहमीच रजा घेतात. त्याची कुणी चर्चासुद्धा कधी करत नाही. यावेळी मात्र महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांच्या रजा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण एकाच वेळी सात वरिष्ठ अधिकारी सुटीवर गेले आहेत. अवघी मनपा अधिकाऱ्यांविना रिकामी झाली आहे. त्यामुळे अधिकारी गेले कुठे, याचा शोध पदाधिकारी घेत आहेत. मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, उपआयुक्त विशाल वाघ, मुख्य लेखाधिकारी संतोष दंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, नगर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता अनिल घुमडे आणि विजय बोरीकर हे प्रमुख अधिकारी रजेवर आहेत. 

या सर्वांनी ८ आणि ९ जुलैचा रजेचा अर्ज सादर केला आहे. सर्वांना एकाच दिवशी एकाच नमुन्यात रजेचा अर्ज दाखल केला. १० जुलैला दुसरा शनिवार आहे. त्या दिवशी शासकीय सुट्टी असते. रविवारला तर कर्मचाऱ्यांच्या हक्काची सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस या अधिकाऱ्यांना रजा मिळणार आहे. एकाच वेळी, एकाच दिवशी रजा घेण्याच्या अधिकाऱ्यांच्या या विचित्र योगायोगावर सध्या काथ्याकूट सुरू आहे. या सर्वांना एकाच दिवशी रजेचे काम कसे पडले, असा प्रश्न काही पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. काही नगरसेवक पदाधिकारी अधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटनाचा बेत आखला असावा. त्यात आम्हाला सामील केले नाही, म्हणून कासावीस झाले आहे. 

रजेवरील बहुतेक अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबल आहे. त्यामुळे कौटुंबिक कारणांमुळे रजेवर आहे की अन्य याची पुष्टी होऊ शकली नाही. त्यातच साहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक यांचे लग्न असल्याने तेही रजेवर गेले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पालिका पहिल्यांदाच अधिकाऱ्यांविना पोरकी झाली आहे. काम घेऊन आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा रखडल्याची बोंब पदाधिकारी ठोकत आहे. मनपातील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे फारसे सख्य नाही. त्यांच्यात अधेमधे खटके उडत असतात. या पार्श्वभूमीवर सामूहिक रजा घेऊन अधिकाऱ्यांनी  ‘चिंतन बैठक’ तर घेतली नसेल ना, अशीही एक शंका घेतली जात आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com