मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारावा, अन् पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून घ्यावा... - the chief minister should set up oxygen plant and guardian minister should provide funds | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारावा, अन् पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून घ्यावा...

केतन पळसकर 
मंगळवार, 13 एप्रिल 2021

कोरोना महामारीच्या या कठीण काळात भीतीदायक आणि नकारात्मक बातम्या देण्यापेक्षा कोरोना योद्धे व नागरिकांचे मनोबल उंचावेल अशा सकारात्मक बातम्यांवर भर द्या, असे न्यायालयाने प्रसार माध्यमांना आवाहन केले. तसेच, दुदैवी घटनांच्या अतिरंजित बातम्या देणे टाळावे, असाही उल्लेख न्यायालयाने केला.

नागपूर : कोरोनाचा दिवसागणिक वाढता प्रकोप आणि त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली. कोरोनाबाधित रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये भरती होण्यासाठी खाटा उपलब्ध नसल्याची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होऊ शकतील, या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट शहरामध्ये स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना दिले. पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये समन्वय साधून लागणारा निधी उपलब्ध करून घ्यावा, असेही आदेशामध्ये नमूद केले आहे.  

शहरामध्ये दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी ठेवली. या दरम्यान, विविध समस्यांचा आढावा न्यायालयाने घेत आवश्यक आदेश दिले. ऑक्सिजन सिलिंडरच्या बाबतीत तातडीने लक्ष घालत प्लांटची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलावी, अशा सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना काल दिल्या. तसेच, याबाबत कोणता निर्णय घेतला, यावर आजच उत्तर दाखल करावे, असे आदेश पालकमंत्र्यांना दिले. न्यायालयीन मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, असिस्टंट सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, वरिष्ठ विधिज्ञ एम. जी. भांगडे व अ‍ॅड. डी. पी. ठाकरे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी विविध पक्षकारांतर्फे कामकाज पाहिले. या प्रकरणी न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

...काय म्हणाले न्यायालय… 
-रेमडिसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी पावले उचला 
-तोसीनिझुमाव इंजेक्शनचा कृत्रीम तुटवडा आणि काळाबाजार यावर अहवाल देण्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना आदेश 
-कोविड रुग्णालयातील डॉक्टर,परिचारिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बळ पुरवावे 
-रुग्णालयात गोधळ घालणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांविरूध्द पोलिसांनी कारवाई करावी 

महापौरांच्या विधानावर संशय 
मानकापूर येथील क्रीडा संकुलामध्ये ५०० खाटांची सुविधा उपलब्ध करून दिल्याची माहिती महापौरांनी दिली. याबाबत वृत्तपत्रांमध्ये त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. मात्र, उच्च न्यायालयामध्ये महापालिका कुठलेही उत्तर दाखल करायला तयार नाही. महापौरांनी दिलेल्या या प्रतिक्रियेचा खरच अंमलबजावणी झाली आहे किंवा नाही, याबाबत आज महापालिका आणि महापौरांनी स्वतंत्र शपथपत्र दाखल करीत माहिती द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त आणि महापौर दयाशंकर तिवारी यांना दिले. 

हेही वाचा : काँग्रेस मोदींना विचारतेय....'त्या' युद्धाचे काय झाले?
 
मनोबल उंचाविणाऱ्या बातम्या द्या 
कोरोना महामारीच्या या कठीण काळात भीतीदायक आणि नकारात्मक बातम्या देण्यापेक्षा कोरोना योद्धे व नागरिकांचे मनोबल उंचावेल अशा सकारात्मक बातम्यांवर भर द्या, असे न्यायालयाने प्रसार माध्यमांना आवाहन केले. तसेच, दुदैवी घटनांच्या अतिरंजित बातम्या देणे टाळावे, असाही उल्लेख न्यायालयाने केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख