आधी रेड्डींवर गुन्हा दाखल करा, त्यानंतरच शवविच्छेदन करा; कुटुंबीयांचा अजूनही ठिय्या… - charge reddy first then do the autopsy the family is still standing | Politics Marathi News - Sarkarnama

आधी रेड्डींवर गुन्हा दाखल करा, त्यानंतरच शवविच्छेदन करा; कुटुंबीयांचा अजूनही ठिय्या…

अरुण जोशी
शुक्रवार, 26 मार्च 2021

कुटुंबीयांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्ही या आंदोलनात पडू नका. आम्ही न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा नाइलाज झाला आणि ते तेथून निघून गेले. आता दिपालीचे कुटुंबीय शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या देऊन बसलेले आहेत.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. आज सकाळपासून दिपाली यांच्या कुटुंबीयांसह राजकीय व सामाजिक संघटनांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मुख्य वनरक्षक रेड्डी यांना अटक केली जात नाही. तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. ८ तासांपासून त्यांचे हे आंदोलन सुरूच आहे. 

मुख्य वनरक्षक रेड्डींच्या अटकेसाठी आंदोलक आक्रमक झाले आहे. राजकीय पक्षांचे नेतेही कुटुंबीयांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. पण कुटुंबीयांनी त्यांना तेथून परत जायला सांगितले असल्याची माहिती आहे. पदाधिकारी माघारी गेले असले तरी कुटुंबीय अजूनही शवविच्छेदन गृहासमोर बसलेलेच आहेत. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी यांनी कुटुंबीयांना समजावून सांगितले की, या प्रकरणात आम्ही उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली आहे. आता लगेच रेड्डी यांना अटक करता येणार नाही. पण कुटुंबीय आपल्या मागणीवर अडून आहेत. रेड्डींवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आठ तास उलटूनही मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. 

दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात मुख्य वनरक्षक रेड्डींवर थेट आरोप केलेला नाही. त्यामुळे तपास करण्यापूर्वी असे करणे चुकीचे होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याची माहिती आहे. पण दिपाली यांनी रेड्डींना पत्र देऊनही त्यांनी कारवाई न केल्यामुळे त्यांच्यावर ही स्थिती ओढवली. त्यामुळे शिवकुमार इतकचे रेड्डीसुद्धा दोषी असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. दिपालींनी यापूर्वीही रेड्डींना पत्र देऊन त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती, पण त्यांनी टाळाटाळ केली, असा कुटुंबीयांचा आरोप आहे. 

कुटुंबीयांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, तुम्ही या आंदोलनात पडू नका. आम्ही न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा नाइलाज झाला आणि ते तेथून निघून गेले. आता दिपालीचे कुटुंबीय शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या देऊन बसलेले आहेत. आज सकाळी ९.३० वाजता उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. सध्या त्यांना आयजी ऑफीसमध्ये कडक बंदोबस्तात ठेवले असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा : भांडुप येथील आग महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दिपाली चव्हाण यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे. दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

‘माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे,’ असे दिपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. ‘माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या’, असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 'शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निलंबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पुनर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक  त्रास होत आहे’, असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे. 
Edited By : Atul Mehere 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख