भांडुप येथील आग महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच... - Kirit Somaiya on Bhandup Dreams mall fire | Politics Marathi News - Sarkarnama

भांडुप येथील आग महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

ड्रीम्स मॉल म्हणजे घोटाळ्यांचा महाल आहे. आग लागलेल्या सनराईझ रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नव्हते, अशी माहिती मला मिळाली असून रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.

मुंबई: भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिका प्रशासनाला टार्गेट केले आहे. ड्रीम्स मॉल म्हणजे घोटाळ्यांचा महाल आहे. आग लागलेल्या सनराईझ रुग्णालयाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नव्हते, अशी माहिती मला मिळाली असून रुग्णालयात कोणतीही अग्निशमन यंत्रणा नव्हती. मात्र, तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप सोमय्या यांनी शुक्रवारी केला. येथील मॉलमध्ये रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या रुग्णालयात त्यावेळी 76 रुग्ण दाखल होते. भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईझ हे कोव्हिड रुग्णालय आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 24 पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 8 तासानंतर देखील आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी सोमय्या यांनी पालिका प्रशासनाला लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात ड्रीम्स मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. हा मॉल एचडीआयएल कंपनीने बांधला आहे. या मॉलमध्ये 1056 दुकाने आहेत, त्यापैकी 500 ते 600 दुकाने अजूनही सुरु असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.सनराईझ रुग्णालयाला आग लागल्यानंतर सुरुवातीला दोन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. 

परंतु, या रुग्णांचा मृत्यू आगीमुळे नव्हे तर कोरोनामुळे झाला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावरुन किरीट सोमय्या चांगलेच संतापले. रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असा दावा करणाऱ्यांना सर्वात आधी तुरुंगात टाका. रुग्णांच्या मृत्यूसाठी मॉलच्या मालकांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली. असे बेजबाबदार विधान कसे काय होऊ शकते, याकडेही सोमय्या यांनी लक्ष वेधले. 

दरम्यान, या घटनेनंतर मनसेनेही यावर टीकेची झोड उडवली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली. कोरोनाच्या काळात पैसे उकळण्यासाठी या रुग्णालयाला परवानगी दिली होती का, असा सवाल त्यांनी विचारला. स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले पाहिजे. प्रशासन फक्त नावाला चौकशी करते, पुढे काहीच होत नाही, अशी टीकाही देशपांडे यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख