हिंगण्यात भाजपला खिंडार, आमदार मेघेंवर नाराज होऊन ५६ जणांनी बांधले घड्याळ... - bjp has gap in hingna fifth six people left the bjp and joined ncp | Politics Marathi News - Sarkarnama

हिंगण्यात भाजपला खिंडार, आमदार मेघेंवर नाराज होऊन ५६ जणांनी बांधले घड्याळ...

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 15 मार्च 2021

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात, त्या पक्षाला ताकद देण्याचे काम केले. मात्र त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

नागपूर : हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या कार्यप्रणालीला वैतागलेले भाजपचे माजी जिल्हा महामंत्री आणि माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह ५६ बुथप्रमुखांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वात हा प्रवेश करण्यात आला. हिंगणा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. २०२४ साली आपल्याला तिथे विजय मिळवायचा आहे, यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवीन पक्ष सदस्यांना केले. भाजप १५ वर्षे विरोधात असताना तुम्ही तो पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. असे असतानाही इतर पक्षातून भाजपात आलेल्यांना तिकिटं देऊन भाजपाने निष्ठावंत नेत्यांवर अन्याय केला. इथे मात्र असे होणार नाही, अशी खात्री पाटील यांनी दिली. प्रेम झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला फार मान आहे. पक्षात कार्यकर्ता जपण्याचे काम होते. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला संधी मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला. 

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात, त्या पक्षाला ताकद देण्याचे काम केले. मात्र त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, अभय कुणावार, नगरसेवक हिंमत गडेकर आणि भाजपच्या बुथप्रमुखांसह हिंगणा मतदारसंघातील ५६ बुथप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, श्याम मंडपे, प्रा. सुरेंद्र मोरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : संजय राठोड झाले ॲक्टीव्ह, म्हणाले निधी कमी पडू देणार नाही...

हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या दबावामुळे जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अन्याय करीत असल्याचे सांगत प्रेम झाडे यांच्यासह ३१ स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अन्यायकारक धोरणाचा निषेध करीत दोन दिवसांपूर्वीच  राजीनामा दिला. भारतीय जनता पक्षासाठी २७ वर्षांपासून अहोरात्र झटून पक्षाला ‘अच्छे दिन’ मिळवून देणाऱ्यांनी पक्ष सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ व कट्टर पदाधिकाऱ्यांवर अन्याय करणे व ही बाब स्पष्ट करूनही आमदार समीर मेघे यांच्या दबावामुळे ज्येष्ठ जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई न केली नाही. हे चिंताजनक असल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे प्रेम झाडे यांनी सांगितले. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख