संजय राठोड झाले ॲक्टीव्ह, म्हणाले निधी कमी पडू देणार नाही... - sanjay rathore become active said the funds will not be reduced | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड झाले ॲक्टीव्ह, म्हणाले निधी कमी पडू देणार नाही...

रामदार पद्मावार
सोमवार, 15 मार्च 2021

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांची शिकवण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुखसुध्दा आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करणे, हे माझे कर्तव्य आहे. मी मागील ४ टर्मपासून विधानसभा सभागृहाचा सदस्य आहे. मतदारांसह नागरीकांनाही माझ्या कामाची जाणीव आहे.

दिग्रस : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध जोडून आरोप प्रत्यारोप झाले. अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला. राज्यातील इतर विषय बाजूला सारून विरोधकांनी प्रकरण ताणून धरले. अखेर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी संजय राठोडांनी कॅबिनेट वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि चौकशीतून खरे काय ते समोर येणार असल्याचा विश्वास दर्शविला. या संपूर्ण परिस्थितीशी दोन हात करत संजय राठोडांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.

काल रविवारी १४ मार्चला दिग्रस तालुक्यात संजय राठोड यांचा दौरा झाला. येथील विश्रामगृहात ते कार्यकर्त्यांशी बोलले. लोकांच्या समस्या ऐकून घेत रेंगाळलेली कामे मार्गी लावली. त्याचबरोबर नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांसोबत संवाद साधून त्यांना गावाच्या विकासासाठी प्रस्ताव तयार करायला सांगितले. विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली. 

आजवर झालेल्या सर्व घडामोडींवर माजी वनमंत्री, आमदार संजय राठोड मनमोकळेपणाने बोलले. ते म्हणाले, विरोधकांनी प्रसारमाध्यम व समाज माध्यमांद्वारे घाणेरडे राजकारण करून मला राजकारणासह जीवनातून उठविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. चौकशी अंती सत्य सर्वांसमोर येणारच आहे. माझा पोलीस तपास व न्यायप्रणालीवर विश्वास आहे. त्यामुळे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांकडे लक्ष न देता मी माझ्या कामाला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह रेंगाळलेली कामे पूर्णत्वास नेणे व विकास कामांना गती देण्याला सुरुवात केली आहे. 

सोमवारी जिल्हा मुख्यालयी, मंगळवार व बुधवार मुंबईला आणि गुरुवार, शुक्रवार व शनिवारी मतदारसंघात दौरा करून नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या ऐकून घेऊन त्याचे निराकरण करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी दक्षता बाळगून प्रशासन व आरोग्य विभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासह नेहमी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे व सतत साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवणे, या कोरोनाच्या त्रिसूत्रीचे नियम पाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा : आम्ही अंधारात, तर आता तुम्हीही राहा अंधारातच, तुपकरांना महावितरणला शाॅक...

८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण... 
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यांची शिकवण ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुखसुध्दा आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशाचे पालन करणे, हे माझे कर्तव्य आहे. मी मागील ४ टर्मपासून विधानसभा सभागृहाचा सदस्य आहे. मतदारांसह नागरीकांनाही माझ्या कामाची जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही मला केंव्हाही आवाज द्या, मी लगेच ओ देऊन तुमच्या समस्या सोडविण्याकरिता तत्पर राहणार असल्याचे मत संजय राठोड यांनी व्यक्त केले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख