मंत्री प्राजक्त तनपुरेंना ट्विटरवर एक कवी भेटतो तेव्हा...! काव्यातूनच प्रश्न अन उत्तरही - When a poet meets Minister Prajakta Tanpur on Twitter ...! Questions and answers from poetry | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री प्राजक्त तनपुरेंना ट्विटरवर एक कवी भेटतो तेव्हा...! काव्यातूनच प्रश्न अन उत्तरही

मुरलीधर कराळे
सोमवार, 1 मार्च 2021

तू इलेक्ट्रिशियन आहेस की कवी ???

भरती झाल्यावर तुझा सत्कारच करावा लागेल मला !!

नगर : सोशल मीडियावर मंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती करणारे कमी नाहीत. मंत्रीही त्यांना तितक्याच खुबीने उत्तर देत आहेत. नुकतेच ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना ट्विटरवर काव्य, उखाण्याच्या रुपात एका कार्यकर्त्याने भरतीबाबत प्रश्न विचारला, त्यावर तनपुरे यांनीही काव्य करीत उत्तर तितक्याच खुबीने दिले. अर्थात त्यावर कमेंटही काव्यरुपानेच येणार नसतील तर नवलच ! ट्विटरवर भेटलेल्या कविला तनपुरे यांनीही कवितेतूनच उत्तर दिले, हे विशेष. 

हेही वाचा... कोल्हार घोटी रस्त्यासाठी सात कोटी

वीजवितरणमध्ये नोकरभरती रखडलेली आहे. याबाबत रोहण ताजणे यांनी तनपुरे यांना ट्विटरवर उखाण्यातून विचारणा केली. ते म्हणतात,

आयुष्यभर साथ देतो, तोच कर्मचारी खरा !

प्राजक्त दादाचं नाव घेतो, तनपुरे साहेब आता तरी भरती करा !!

यावर तनपुरे यांनी ट्विटरवर उत्तर दिले, ते असे -

भरतीसाठी सदोदित तळमळतो, तोच विद्युत सहाय्यक खरा !

तुमच्यासाठी खरंच लढतोय, जरा धीर धरा !!

यावर कमेंट करताना ताजणे पुन्हा काव्य करतात -

साहेब, तुम्ही म्हणतात, जरा धीर धरा!

पण तुम्ही 100 टक्के भरती करा !!

यावर प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा ट्विट केले. ते म्हणतात. -

प्रयत्न आहेत आमचे प्रामाणिक,

अडचणी येती दिवसागणिक

काळजी नसावी,

सोडवू आम्ही नक्की भरतीचे गणित !

असे काव्य करून तनपुरे यांनी त्याला थेट प्रश्न विचारला -  

तू इलेक्ट्रिशियन आहेस की कवी ???

भरती झाल्यावर तुझा सत्कारच करावा लागेल मला !!

दरम्यान, मंत्री, आमदार यांना ट्विटरच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते प्रश्न विचारत असतात. त्यावर मंत्रीही तितक्याच खुबीने उत्तर देतात. अनेक प्रश्न ट्विटवर थेट मंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सुटले आहेत. थेट विचारलेल्या प्रश्नावर लोकनेते आवर्जुन उत्तर देताना दिसत आहेत. तनपुरे यांच्याबाबतही असाच प्रकार घडला. परंतु संबंधित कवी असावा.

हेही वाचा... मी मंत्री असतो, तर राजीनामा दिला असता

नोकर भरती करण्याची मागणी त्यांनी ट्विटरवर करताना अत्यंत खुबीने काव्य केले आहे. त्याला तनपुरे यांनीही काव्याच्या रुपातून उत्तर दिले. संबंधिताने पुन्हा ट्विट केल्याने तनपुरे यांनी मात्र त्याला तू इलेक्ट्रिशियन आहे, की कवी असाच थेट प्रश्न विचारला.

दरम्यान, जिल्ह्यात व महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या विजेचा मोठा प्रश्न आहे. तनपुरे यांच्या तालुक्यात सुद्धा रोहित्रे उतरवून घेतले जात आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वीज बिले भरण्याचा तगादा जोरात सुरू झाला असून, अनेक शेतकरी प्रश्न विचारून भांडावून सोडत आहेत. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख