कोल्हार घोटी रस्त्यासाठी थोरातांच्या प्रयत्नातून सात कोटी - Seven crores from Thorat's efforts for Kolhar Ghoti road | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हार घोटी रस्त्यासाठी थोरातांच्या प्रयत्नातून सात कोटी

आनंद गायकवाड
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

वाहतुकीची मोठी घनता असल्याने या महत्वाच्या राज्यमार्गाची वारंवार दुरवस्था होते आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोरोना संकट व शासनाच्या विविध निर्बंधांमुळे या कामाची निविदा करण्यास विलंब झाला होता.

संगमनेर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे संगमनेर शहरातून जाणाऱ्या, अती वर्दळीच्या व कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या, कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामाला अखेर मंजूरी मिळाली आहे. सुमारे सात कोटी रुपये खर्चाच्या य़ा रस्त्याचे काम मालपाणी इस्टेट (अकोले रोड) ते कोंची फाटा या अंतरात होणार असून, मार्च महिन्यात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, की वाहतुकीची मोठी घनता असल्याने या महत्वाच्या राज्यमार्गाची वारंवार दुरवस्था होते आहे. या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही कोरोना संकट व शासनाच्या विविध निर्बंधांमुळे या कामाची निविदा करण्यास विलंब झाला होता. आता शासनाने रस्त्यांच्या निविदांवरील निर्बंध उठवल्यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा काढली आहे.

हेही वाचा... खासदार विखेंच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी निधी

या कामास साधारणतः मार्च महिन्यापासून सुरवात होणार आहे. या अंतर्गत दिल्ली नाका परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच दिल्ली नाका चौकापासून समनापूर हद्दीतील गणपती मंदिरापर्यंतचे जुने दुभाजक काढून नवीन दुभाजक टाकण्यात येणार आहेत. तसेच या मार्गावरील जीर्ण पथदिवेही बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील तीनबत्ती चौक, मेनरोड ते म्हाळुंगी पूल (अकोले रोड) या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करून म्हाळुंगी पूल, नाटकी पूलाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामामुळे या महत्वाच्या मार्गाची दूरवस्था संपून वाहतुक सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
 

हेही वाचा...

सारोळेपठार येथील माजी सरपंच व ग्रामसेवकावर अपहाराचा गुन्हा दाखल

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील सारोळेपठार येथील ग्रामपंचायतीचा माजी सरपंच व ग्रामसेवकाने 2014 - 15 व 2017 - 18 या कालावधीत कामे न करता, शासकिय निधीतून सुमारे 25 लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल माळी यांच्या फिर्यादीवरुन, माजी सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व तत्कालिन ग्रामसेवक सुनिल शेळके यांच्याविरुध्द फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा.... वाळु लिलावावरून रामपूरमध्ये मारामारी

या प्रकरणी अमित बादशहा फटांगरे यांनी मूळ तक्रार केली होती. त्याप्रमाणे या प्रकरणाच्या चौकशीसाठी गटविकास अधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार सरपंच व ग्रामसेवकाने 2014 - 2015 ते 2017 - 2018 या काळात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता केल्याचा अहवाल दिला. यावर म्हणणे मागितले असता, सरपंचांनी म्हणणे सादर केले नाही. कामाचे अंदाजपत्रक घेणे, मूल्यांकन आदी कामांना ग्रामपंचायत सभेची मान्यता न घेता सरपंच फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार रुपये स्वतःच्या नावाने धनादेश घेत काढले. तसेच संयुक्त जबाबदारी असलेल्या बँक खात्यातून काढलेल्या रकमेतील 50 टक्के रकमेलाही त्यांना जबाबदार धरण्यात आले. अशा प्रकारे सरपंचाने 16 लाख 13 हजार तर, ग्रामसेवकाने 9 लाख 8 हजार असा एकूण 25 लाख 21 हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी सरपंचाने तब्बल 82 वेळा सरपंचाने स्वतःच्या नावे धनादेशाने पैसे काढले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडेही अहवाल पाठवण्यात आला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल करण्याचा आदेश दिला. या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीने सर्व सक्षम पुरावे गोळा केले आहेत. असे प्रकार घडत असल्याने महाराष्ट्रातील ग्रामसेवकांमधूनचर्चा होत आहे.
 

Edited By  - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख