वैभव पिचड यांची जिल्हा बॅंकेच्या रिंगणातून माघार ! कोणता मुद्दा भावला? - Vaibhav Pichad withdraws from District Bank What's the point? | Politics Marathi News - Sarkarnama

वैभव पिचड यांची जिल्हा बॅंकेच्या रिंगणातून माघार ! कोणता मुद्दा भावला?

शांताराम काळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून पिचड यांनी कोणत्या मुद्द्यावरून माघार घेतली, याबाबत आता खलबते सुरू आहेत.

अकोले : जिल्हा सहकारी बँकेत अनुसूचित जाती जमाती व प्रक्रिया उद्योगमधून माजी आमदार वैभव पिचड यांनी माघार घेत इतरांचा मार्ग मोकळा करून दिला असला, तरी विखे- थोरात गटात अजूनही खलबते चालू आहेत. या दोन्ही जागांवर अद्याप दोन वाजेपर्यंत निर्णय झालेला नव्हता.

दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या असलेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून पिचड यांनी कोणत्या मुद्द्यावरून माघार घेतली, याबाबत आता खलबते सुरू आहेत.

हेही वाचा... राष्ट्रवादी साडून गेले, तरीही गायकरांची नाळ कायम

एका जागेसाठी सात उमेदवार रिंगणात होते. त्यात माजी आमदार वैभव पिचड, डॉ. चेतन सदशिव लोखंडे, नंदकुमार डोळस, निवास त्रिभुवन, अशोक भांगरे, अमित भांगरे, दीपक गायकवाड उभे होते. मात्र काल अकोले येथील पत्रकार परिषदेत दशरथ सावंत, सुरेश गडाख यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेतली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला. त्यामुळे रात्री गणिते बदलली व आज माजी आमदार वैभव पिचड यांनी आपली माघार घेत इतरांना मार्ग मोकळा करून दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे किंवा अमित भांगरे यांना उमेदवारी मिळणार की शिवसेनेच्या वतीने खासदार लोखंडे यांचे पूत्र डॉ. चेतन लोखंडे यांना उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच भाजपचे विखे पाटील भाजपच्या इतर कोणत्या उमेदवाराला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा... विवेक कोल्हे यांच्या रुपाने तिसरी पिढी बॅंकेवर

मंत्री थोरात व माजी मंत्री विखे यांच्या दोन ठिकाणी बैठका सुरू असून, निर्णयाच्या प्रतीक्षेत  आहेत. मात्र अकोले तालुक्यात एकमेव उमेदवार सीताराम गायकर यांची जिल्हा बँकेवर वर्णी लागली असून, पिचड यांच्या माघारीबाबत त्यांनी का निर्णय घेतला हे समजू शकले नाही मात्र तालुक्यात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे .
 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख