राष्ट्रवादी सोडून गेले, तरीही गायकर यांची अजित पवारांशी नाळ कायम - Ajit pawar News, Even after the NCP left, Gaikar's relationship with Ajit Pawar remained intact | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी सोडून गेले, तरीही गायकर यांची अजित पवारांशी नाळ कायम

मुरलीधर कराळे
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

सत्ता आल्यावर सीताराम गायकर यांना धडा शिकवू,' असे ते म्हणाले होते. आज मात्र त्यांच्याच मदतीमुळे गायकर यांचा पुन्हा संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला.

नगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द अंतिम मानत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत व सुरेश गडाख यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दीड वर्षापूर्वी पवार यांनी गायकर यांच्यावर टीका केली होती. "सत्ता आल्यावर सीताराम गायकर यांना धडा शिकवू,' असे ते म्हणाले होते. आज मात्र त्यांच्याच मदतीमुळे गायकर यांचा पुन्हा संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला. 

हेही वाचा.. दोन दिवसांच्या माघाराची खेळ

विधानसभा निवडणुकीदरम्यान नाट्यमय घडामोडी होऊन, माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्यासोबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हेही राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात गेले. पिचड यांच्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून गायकर यांची प्रतिमा होती. यापूर्वी पवार यांच्यामुळेच गायकर यांना महानंद दूध संघावर संचालकपद व जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद मिळाले होते. तरीही पवार यांना सोडून गायकर पिचड यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर अजित पवार अकोले दौऱ्यावर आले होते.

22 सप्टेंबर 2019 रोजी त्यांची अकोल्यात सभा झाली. तेथे पवार यांचे भाषण सुरू असतानाच उपस्थितांमधून, गायकर यांच्याविषयी बोला, अशी मागणी होऊ लागली. त्या वेळी पवार म्हणाले होते, ""तुम्ही घड्याळाला मतदान करा; सत्ता आल्यावर गायकरांना धडा शिकवू. काय कमी केले होते? जिल्हा परिषदेत दोन सदस्य असताना महत्त्वाचे सभापतिपद दिले. गेली चार वर्षे जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद दिले.'' 

हेही वाचा... गायकरांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा

पवार-गायकर नाळ कायम 

गायकर पूर्वी अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते, हे महाराष्ट्राला ज्ञात आहे. पवार-गायकर यांची ही नाळ आज पुन्हा दिसून आली. केवळ अजित पवार यांच्या सांगण्यावरून सावंत व गडाख माघार घेत आहेत. त्यामुळे गायकर पुन्हा जिल्हा बॅंकेचे संचालक होणार आहेत. यापूर्वी बॅंकेचे अध्यक्ष केले, आता ते राष्ट्रवादीत नसतानाही त्यांना संचालक केले जात आहे. म्हणजेच आगामी काळात गायकर किती दिवस भाजपमध्ये दिसणार, हा संशोधनाचा विषय ठरावा! 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख