राळेभात कुटुंबियाची दुसरी पिढी अमोलच्या रुपाने जिल्हा बॅंकेत - The third generation of the Ralebhat family in the form of Amol in the District Bank | Politics Marathi News - Sarkarnama

राळेभात कुटुंबियाची दुसरी पिढी अमोलच्या रुपाने जिल्हा बॅंकेत

वसंत सानप
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

सहकार महर्षी स्वर्गीय गोपाळराव सोले पाटील व त्यांचे पूत्र पांडुरंग पाटील सोले हे दोघे पितापूत्र जामखेड तालुक्यातून सहकारी बँकेवर 'संचालक' झाले  होते. सोले यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली.

जामखेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून अमोल जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीने राळेभात कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला.

तालुक्यातील सर्वात कमी वयाचे संचालक होण्याचा 'मान' अमोल यांना मिळाला. विशेष म्हणजे अमोल यांचे वडील जगन्नाथ तात्या राळेभात यांची सहकारी बँकेच्या राजकारणात पहिल्यांदा 'बिनविरोध' संचालक होऊनच सुरुवात झाली होती. तोच कित्ता अमोल यांनी गिरवला.

हेही वाचा... कर्डिलेंना अजितदादांऐवीज थोरातांकडे चकरा मारल्या अन...

यापूर्वी सहकार महर्षी स्वर्गीय गोपाळराव सोले पाटील व त्यांचे पूत्र पांडुरंग पाटील सोले हे दोघे पितापूत्र जामखेड तालुक्यातून सहकारी बँकेवर 'संचालक' झाले  होते. सोले यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली.

दरम्यान, साहेबराव आबा पाटील हे देखील बँकेवर संचालक व अध्यक्ष राहिले. या दोघांच्यानंतर जगन्नाथ तात्या राळेभात हे विखे समर्थक म्हणून प्रदीर्घ काळ बँकेवर संचालक राहिले. मात्र सत्तेच्या सारीपाटात त्यांच्या काळात बँकेच्या सत्तेची सूत्रे थोरात गटाकडे अधिक राहिल्याने पदाधिकारी होण्याची संधी तात्यांना मिळाली नाही. मात्र बँकेच्या संचालक मंडळात त्यांचा दबदबा कायम राहिला.

हेही वाचा... विवेक कोल्हे कोल्हे यांच्या रुपाने जिल्हा बॅंकेत तिसरी पिढी

एकाच कुटुंबातील पितापूत्र संचालक होण्याचा मान सोले पाटील कुटुंबियानंतर या वेळी राळेभात कुटुंबाला मिळाला. या राजकीय नोंदीची बरोबरी ही अमोल यांच्या निवडीने साधली गेली.

कशी मिळाली बिनविरोधची संधी

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरुन तीन दिवसापूर्वी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतल्यानंतर ज्येष्ठ संचालक जगन्नाथ राळेभात व त्यांचे चिरंजीव अमोल या दोघांचेच अर्ज राहिले होते.  जेष्ठ नेते जगन्नाथ राळेभात यांनी आपला उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने अमोल यांची  बिनविरोध निवड झाली. यानिमित्ताने राळेभात कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा सहकारी बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.

अमोल हे खासदार डॉ. सुजय विखे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच जामखेड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. त्यांचे वडील जगन्नाथ राळेभात यांच्या राजकीय प्रवासात ते सावलीसारखे त्यांच्या सोबत राहिले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना संधी मिळालेली असली, तरी बँकेच्या कामकाजाची त्यांना चांगली माहिती आहे. अभ्यासू आणि स्पष्टोक्तेपणा ही त्यांची खासियत आहे.
 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख