कर्डिलेंनी अजितदादांऐवजी थोरातांकडे चकरा मारल्या आणि गुलालाची पोती तशीच राहिली.... - Shivajirao kardile makes mistake in District bank election and fails to elect unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

कर्डिलेंनी अजितदादांऐवजी थोरातांकडे चकरा मारल्या आणि गुलालाची पोती तशीच राहिली....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

मास्टरमाइंड ठरणारे कर्डिले डावपेचात पिछाडीवर 

नगर: अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी 17 जागा बिनविरोध झाल्या. त्यामध्ये जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे यांचा समावेश राहिला. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधातील अर्ज मागे घेण्यात न आल्याने त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले.

कर्डिले यांच्या समर्थकांना बिनविरोध निवडीची खात्री होती. त्यासाठी गुलालाची पोतीही तयार होती. निवडणुकीच्या खेळात पक्के वस्ताद समजल्या जाणाऱ्या कर्डिले यांची खेळी कुठे चुकली, याचा आथा शोध घेतला जात आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कर्डिले यांनी संगमनेरला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या बैठकिला उपस्थित राहून थोरात यांना अप्रत्यक्षरित्या साथ दिली. त्याचाच परिपाक म्हणून अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या बिनविरोधबाबत उत्सुकता कायम राहिली. अखेर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते मंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी टाकलेल्या डावात कर्डिले यांना झुंजायला लावले, असे मानले जाते.

कर्डिले हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न भेटता थोरात यांच्याकडे रदबदली करत होते. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांचा बिनविरोधचा मार्ग रोखल्याची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांनी या निवडणुकीत महत्वाचे निर्णय करत समर्थकांची निवड बिनविरोध होईल, याकडे जातीने लक्ष दिले. मग कर्डिले यांच्याकडेच दुर्लक्ष कशामुळे झाले, हे आता कार्यकर्त्यांच्या चर्चेतून समजत आहे. कर्डिले यांच्या विरोधातील उमेदवार या थोरात यांच्या समर्थक असल्याने कर्डिले हे थोरातांकडे बिनविरोधसाठी आग्रह धरत होते. पण राष्ट्रवादीने इतर ठिकाणी काॅंग्रेसचे उमेदवार बिनविरोध निवडून देऊन कर्डिलेंच्या विरोधातील अर्ज कायम ठेवण्यासाठी भाग पाडले. 

 जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत अनेकदा कर्डिले मास्टरमाईंड ठरतात. त्यां सल्ला बहुतेक नेत्यांना कामे येतो. त्यांची टोपी फिरली, की राजकारण फिरते, असे मानले जाते. या निवडणुकीत मात्र माशी शिंकली. कर्डिले यांनी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. नगर तालुक्यातील बहुतेक सेवा संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक अवघड नाही, असे चित्र आहे. असे असताना त्यांच्या विरोधात पद्मावती संपतराव म्हस्के व सत्यभामा भगवानराव बेरड यांचेच अर्ज उरले होते. आज म्हस्के यांनी अर्ज मागे घेतला, मात्र सत्यभामा बेरड यांनी ऐनवेळी अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे कर्डिले यांच्या विरोधात बेरड अशी लढत निश्चित झाली.

बेरड या राष्ट्रवादीचे नेते भगवानराव बेरड यांच्या पत्नी आहेत. महाआघाडीची सुत्रे बाळासाहेब थोरात यांनी हलविली. कर्डिले यांना बिनविरोधसाठी थोरात यांनी बेरड यांना का आदेश दिले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तथापि, विखे पाटील व तनपुरे यांच्यामुळे हा अर्ज ठेवण्यात आला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्डिले जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वितरण करून त्यांनी सेवा संस्थांवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या मतदारसंघातील 108 सेवा संस्थांपैकी बहुसंख्य संस्थांचे ठराव आपल्या बाजुने असल्याचा दावा कर्डिले करीत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना व सेवा संस्थांना मिळालेले हा लाभ कर्डिले यांची जमेची बाजू ठरली होती. त्याचबरोबर विरोधकांनीही विशेष ताकद लावली नसल्याने कर्डिले यांचे वर्चस्व निर्वाद राहिले आहे. त्यामुळे बिनविरोधचा मार्ग कर्डिले यांना सुकर असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात उलटेच घडले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख