मला बिनविरोध होऊ न देण्यासाठी काही पुढारी `लढले` : शिवाजी कर्डिले - Some leaders 'fought' not to let me be unopposed: Shivaji Kardile | Politics Marathi News - Sarkarnama

मला बिनविरोध होऊ न देण्यासाठी काही पुढारी `लढले` : शिवाजी कर्डिले

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यात जिल्ह्यातील साखर कारखानदार व प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपापल्या जागा बिनविरोध करून घेतल्या; पण माझी जागा बिनविरोध होऊ नये, यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली.

नगर : "जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यात जिल्ह्यातील साखर कारखानदार व प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपापल्या जागा बिनविरोध करून घेतल्या; पण माझी जागा बिनविरोध होऊ नये, यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रतिष्ठा पणाला लावून मला संपविण्याचा प्रयत्न केला. मी बिनविरोध होऊ नये, यासाठी काही पुढारी लढले,'' अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.

हेही वाचा... धक्कादायक, डाॅक्टर दाम्पत्यांनी केली आत्महत्या 

जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मतदान झाल्यावर मतदारांच्या आभार सभेत कर्डिले बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, विष्णू खांदवे, सुरेश शिंदे, बलभीम शेळके, दत्ता शेळके, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाश घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, वसंत सोनवणे आदी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, "लोकशाही पद्धतीने निवडणुकीला सामोरा गेलो असून, मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहे. जिल्हा बॅंक निवडणूकप्रक्रिया सुरू झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तीत पक्षातर्फे निवडणुकीची जबाबदारी आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माझ्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांची भेट घेऊन मी बॅंक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विखे यांच्याशी संपर्क केला.

हेही वाचा...कर्डिलेंच्या निकालाकडे लक्ष 

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही संपर्क केला. दोन्ही बाजूंचे नेते बिनविरोधसाठी तयार झाले. त्यात काहींनी आपापल्या जागा बिनविरोध करीत, माझ्या जागेसाठी निवडणूक लावली.''

 

हेही वाचा... 

दोनशे जणांवर फौजदारी 

श्रीरामपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, येथील प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तालुक्‍यातील उंदीरगाव येथे एकाच कुटुंबात दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने काल बैठक घेऊन आढावा घेतला. शहर पोलिस पथकाने काल सायंकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना अडवून मास्क लावण्याची सक्‍ती केली. तसेच, फौजदारी कारवाई करून दंड वसूल केला. 

पालिका आणि पोलिसांनी आज शहर परिसरात विनामास्कच्या दोनशेहून अधिक नागरिकांवर कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली. नियमित मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सक्ती स्थानिक प्रशासनाने केली. अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिले. पोलिसांनी आज येथील बसस्थानक, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठेसह विविध चौकांत कोरोनाबाबत नियमांचे उल्लंघन केलेल्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. तहसीलदार प्रशांत पाटील आणि प्रांताधिकारी अनिल पवार यांनी सकाळी शहरात फेरफटका मारून नागरिकांना कोरोनाबाबत सूचना केल्या. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख