"राष्ट्रवादी'च्या हाती कारखानदारांची दोरी ! जिल्हा बॅंकेवर अध्यक्ष बिनविरोध

राजकीय वाटाघाटींनंतर अखेर जिल्हा सहकारी बॅंकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला. "राष्ट्रवादी'चे ऍड. उदय शेळके यांना अध्यक्षपद, तर कॉंग्रेसचे माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपद मिळाले.
"राष्ट्रवादी'च्या हाती कारखानदारांची दोरी ! जिल्हा बॅंकेवर अध्यक्ष बिनविरोध
adcc bank.jpg

नगर : राजकीय वाटाघाटींनंतर अखेर जिल्हा सहकारी बॅंकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला. "राष्ट्रवादी'चे ऍड. उदय शेळके यांना अध्यक्षपद, तर कॉंग्रेसचे माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपद मिळाले.

ऍड. शेळके हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते, तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचेजावई असल्याने, एक प्रकारे पुन्हा एकदा बॅंकेवर थोरात यांचेच वर्चस्व सिद्ध झाले. असे असले, तरी कोणताही साखर कारखाना हाती नसणाऱ्या शेळके यांना अध्यक्षपद देऊन जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न होऊ शकेल. तसेच, कारखानदारीची दोरी अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रवादीच्याच हाती आल्याचे मानले जाते. 

जिल्हा बॅंकेच्या 21पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. 4 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळविल्या. भाजपला कमी जागा मिळाल्याने, त्यांचा अध्यक्ष- उपाध्यक्षपदाचा पत्ता कट झाला. तिन्ही पक्षांच्या समन्वयातून आघाडीचाच अध्यक्ष होणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार झालेल्या राजकीय वाटाघाटींत उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री थोरात यांच्या समन्वयाने राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेले.

प्रारंभी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव चर्चेत होते. मात्र, त्यांचा साखर कारखाना आहे. कर्जवाटप करताना कोणत्याही कारखान्याला झुकते माप नसावे. त्यामुळे कारखाना नसणारा अध्यक्ष असावा. घुले यांच्या पत्नी राजश्री जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यामुळेच एकाच घरात दोन मोठी पदे नसावीत, असे मुद्दे पुढे येऊन त्यांचे नाव मागे पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांनाही अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. 

घुले यांच्या बंगल्यावरून हलली सूत्रे 

निवडप्रक्रिया दुपारी होणार असल्याने, सकाळपासूनच महसूलमंत्री थोरात, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख नगरला तळ ठोकून होते. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्या बंगल्यावर थांबून नेत्यांनी सूत्रे हलविली. ठरल्याप्रमाणे अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने, दोघांची बिनविरोध निवड झाली. 

कारखानदारांची नव्हे, शेतकऱ्यांची बॅंक 

जिल्हा बॅंकेवर पूर्वी अनेकदा साखर कारखानदारांचीच वर्णी लागली. हा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न संचालक व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला. कारखान्यांना दिले जाणारे कर्ज मोठे असते. सर्वसामान्य शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न झाले. नवीन अध्यक्ष ऍड. शेळके हे अशीच भूमिका घेऊन सर्वांना न्याय देतील, असा विचार पुढे आला. 

"सरकारनामा'चा अंदाज खरा ठरला 

"गुलाल कोणाचा...! अध्यक्षपदासाठी घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची एन्ट्री' या मथळ्याखाली "सरकारनामा'ने सर्वप्रथम बातमी दिली होती. ऍड. शेळके अध्यक्ष, तसेच उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची वर्णी लागेल, असा अंदाज व्यक्त केला होता. "सरकारनामा'चा अंदाज तंतोतंत खरा ठरला. 

Related Stories

No stories found.