शेळके यांच्या रुपाने पारनेरच्या मुकुटात आणखी एक राष्ट्रवादीचा तुरा - Another NCP crown in Parner's crown in the form of Shelke | Politics Marathi News - Sarkarnama

शेळके यांच्या रुपाने पारनेरच्या मुकुटात आणखी एक राष्ट्रवादीचा तुरा

मुरलीधर कराळे
शनिवार, 6 मार्च 2021

जिल्हा बॅंकेची सूत्रे हाती आल्याने शेळके यांच्या रुपाने पारनेरला मोठी ताकद मिळाली आहे.

नगर ः अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे संचालक उदय शेळके यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यापूर्वी आमदार नीलेश लंके यांनी शिवसेनेचा गड फोडला. आता त्या गडावर शेळके यांच्या रुपाने पक्षाचा झेंडा रोवण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्हा बॅंकेच्या सभागृहात आज अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उदय शेळके, तर उपाध्यक्षपदासाठी काॅंग्रेसचे माधवराव कानवडे यांचे अर्ज आले. त्यानुसार ते बिनविरोध निवडले गेले असल्याचे जाहीर करण्यात आले. नूतन संचालकांचा सत्कार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. या वेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, बॅंकेचे संचालक तथा माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच सर्व नूतन संचालक उपस्थित होते.

हेही वाचा... महापालिका, ती जागा शिवसेनेला देण्यास भाजप इच्छुक

बॅंकेचे 21 संचालकांपैकी 17 बिनविरोध झाले. 4 संचालकांसाठी निवड होऊन ही निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून वेगवान राजकीय हालचाली होत होत्या.

शिवसेनेला आणखी एक धक्का

पारनेरमध्ये शिवसेनेचे नेते माजी आमदार विजय औटी यांनी अनेक वर्ष सत्तास्थानी राहत पारनेर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले होते. तथापि, त्यांचेच कार्यकर्ते असलेले तत्कालीन तालुका प्रमुख नीलेश लंके यांनी स्वतःचे अस्तीत्त्व दाखविण्यास सुरूवात केली. त्याच वेळी औटी व लंके यांच्यात वैमनस्य होऊन लंके यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून उमेदवारी करीत लंके यांनी पक्षाची ताकद वाढविली. अनेक संस्था राष्ट्रवादीला घेता आला. आता जिल्हा बॅंकेची सूत्रे हाती आल्याने शेळके यांच्या रुपाने पारनेरला मोठी ताकद मिळाली आहे.

हेही वाचा... उद्योजक मालपाणी यांचे बनावट फेसबूक अकाउंट

बॅंकिंग क्षेत्राचा अनुभव

शेळके हे जी.एस. महानगर बॅंकेचे अध्यक्ष आहेत. ही बॅंक राज्यात नावाजलेली आहे. हा मोठा अनुभव पाठिशी असल्याने शेळके यांच्याकडून उत्तम प्रशासन होईल, अशी अपेक्षा आज इतर संचालकांनी व्यक्त केली. बॅंकेचे अनेक संचालक साखरसम्राट आहेत. त्यांच्या कारखान्यांना बॅंकेच्याच माध्यमातून कर्जपुरवठा होत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या अध्यक्षांना शेळके यांच्याशी सलगी करीत रहावे लागणार आहे. बॅंकिंग क्षेत्राचा मोठा अनुभव जिल्हा बॅंकेच्या प्रशासनालाही त्याचा चांगलाच फायदा होईल, असे संचालकांचे मत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख