शरीराने भाजपमध्ये पण मनाने राष्ट्रवादीतच होतो ः सीताराम गायकर - Physically in BJP but mentally in NCP: Sitaram Gaikar | Politics Marathi News - Sarkarnama

शरीराने भाजपमध्ये पण मनाने राष्ट्रवादीतच होतो ः सीताराम गायकर

शांताराम काळे
सोमवार, 15 मार्च 2021

मला जिल्हा बँकेत अजितदादांमुळे बिनविरोध होण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझे राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे ठरले होते. यापूर्वी पवार यांच्यासमवेत चर्चा झाली.

अकोले : माझ्या राजकारणात व समाजकारणात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मोलाची मदत केली. मी भाजपमध्ये गेलो, मात्र माझे मन तिथे रमले नाही, असे जिल्हा बॅंकेचे संचालक सीताराम गायकर यांनी सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले.

गायकर म्हणाले, की मला जिल्हा बँकेत अजितदादांमुळे बिनविरोध होण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझे राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे ठरले होते. यापूर्वी पवार यांच्यासमवेत चर्चा झाली. उद्या (ता. 16) सकाळी दहा वाजता मुंबई येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मी व माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहे.

हेही वाचा...  प्रशांत गायकवाड यांचे यांचे पवारांनी ऐकले

कोरोनामुळे फार गर्दी न करता अगस्ती कारखान्याचे संचालक व माझे ऋणानुबंध असलेले सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत. या वेळी पर्वत नाईकवाडी, रामनाथ वाकचौरे, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजने, गुलाब शेवाळे व अन्य सहा अगस्तीचे संचालक पहिल्या टप्प्यात प्रवेश करणार आहेत.

सोमवारी सायंकाळी हे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर गायकर मुंबईला पोहचले आहेत. पक्षाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता प्रवेश कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा... आमचं मस्तंच चाललंय

दरम्यान, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या वेळी गायकर यांना बिनविरोध संचालक होण्यासाठी अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगून गायकर यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा करून दिला होता. त्याच वेळी गायकर राष्ट्रवादीत जाणार, हे निश्चित मानले जात होेते. आता तसे गायकर यांनीही सांगितले आहे.

हेही वाचा..

उन्हाळी काद्यांच्या दरात एक हजाराने घसरण

श्रीरामपूर : कांद्याला चांगला दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कवळ्या अवस्थेत असलेला कांदा काढुन बाजारात विक्रीसाठी आणल्याने कांद्याच्या दरात मागील दहा दिवसात एक हजाराने घसरण झाली आहे.

येथील बाजार समितीच्या कांदा लिलावात सध्या आवक वाढत असून, आजच्या लिलावात दोन हजार 578 कांदा गोण्याची आवक झाली होती. त्यात एक नंबरचा कांदा एक हजार ते एक हजार 600 रुपये प्रती क्विन्टल पुकारला गेला. दोन नंबरचा कांद्याला 700 रुपये ते एक हजाराचा भाव मिळाला, तर तृतीय प्रतीच्या कांद्याला 300 रुपये ते 650 रुपये दर मिळाला. तसेच गोल्टी कांद्याला 850 रुपये ते सरासरी एक हजार 250 रुपये दर पुकारण्यात आला. 
मागील दहा दिवसांपुर्वी एक नंबरच्या कांद्याला सरासरी तीन हजार रुपयांचा दर मिळाला होता. तर गोल्टी कांदा सरासरी दोन हजाराने विकला जात होता. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला दर मिळत असल्याने तसेच पाणी टंचाईच्या भितीने कोवळ्या अवस्थेत असलेला कांदा काढुन विक्रीसाठी आणण्यावर भर दिला. त्यामुळे लिलावात कांद्याच्या गोण्याची आवक वाढत गेली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख