फडणवीसांचा सल्ला मानू शकतो, पण इतरांनी शिकवू नये : संभाजीराजेंचा चंद्रकांतदादांना टोला

मी २००७पासून मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे लढ्याविषयी मला कोणी शिकवू नये.
Sambhajiraje.jpg
Sambhajiraje.jpg

कर्जत : ‘‘मी २००७पासून मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहे. त्यामुळे लढ्याविषयी मला कोणी शिकवू नये. एक वेळ देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला तर मी मानू शकतो; परंतु अन्य कोणी शिकवू नये,’’ असा टोला संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता लगावला. (I can follow the advice of Fadnavis, but others should not teach me:)

छत्रपती संभाजीराजे यांनी आज कोपर्डी (ता. कर्जत) येथील निर्भयाच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. सकल मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर ते बोलत होते.

संभाजीराजे म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मी शिपाई आहे. समाजाला आरक्षण व निर्भयाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सरकार कोणाचेही असो; आम्हाला त्याचे देणे-घेणे नाही. आमची लढाई न्यायासाठी आहे. मी छत्रपती शाहू महाराजांच्या तत्त्वानुसार काम करीत आहे. समाजाला आरक्षण हेच माझे ध्येय आहे. कोपर्डीतील घटनेनंतर समाजाने न्यायासाठी ५८पेक्षा जास्त मोर्चे काढले. या घटनेनंतर समाज एकत्र आला ही चांगली गोष्ट आहे; परंतु आरक्षणाचा विषय मार्गी लागला नाही. यापुढील लढाई केवळ आरक्षणासाठीच असेल. मोर्चे काढून झाले आहेत, उगाच वेळकाढूपणा करू नका. ३३८-ब च्या माध्यमातून राज्यपाल व नंतर राष्ट्रपतींकडे जाता येते. त्यानंतर संसदेत हा मुद्दा ठेवता येईल. सरकारने यावर काय करायचे ते ठरवावे. हा माझा ३६ जिल्ह्यांचा दौरा आहे.’’

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, २१८५ जणांच्या रखडलेल्या नियुक्त्या, ओबीसी सवलती व प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे, या आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत.

निर्भयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

निर्भयाच्या आई-वडिलांनी आरोपींना अद्याप फाशीची शिक्षा झाली नसल्याची खंत संभाजीराजेंकडे व्यक्त केली. त्यावर संभाजीराजे म्हणाले, की याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून स्पेशल बेंच नेमण्याची मागणी करू. राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात ॲप्लिकेशन दिले पाहिजे. निर्भयाला न्याय न मिळणे दुर्दैवी आहे. निर्भयाच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केल्यानंतर आरक्षणासाठी समाजातर्फे मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

संभाजीराजे प्रथमच तालुक्याच्या दौऱ्यावर आल्याने कोपर्डी ग्रामस्थ, सकल मराठा समाज व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळांची भेट देत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनीही एका शेतातील औतावर बसून, घरून आणलेल्या भाजी-भाकरीचा आस्वाद घेतला.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com