कोरोनातून शिकवण, अण्णा हजारे यांनी दिला हा मोठा सल्ला - Coaching from Corona, Anna Hazare gave great advice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

कोरोनातून शिकवण, अण्णा हजारे यांनी दिला हा मोठा सल्ला

एकनाथ भालेकर
बुधवार, 16 जून 2021

या वेळी सायकल रॅली पारनेर येथे पोहचल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे स्वागत करत सर्वांना चहा व नाश्त्या दिला. या वेळी पारनेर पोलिसांनी सायकल रॅलीस सहकार्य केले.

राळेगणसिद्धी : कोरोनातून (Corona) माणवाला मोठी शिकवण मिळाली आहे. पर्यावरण रक्षणाशिवाय पर्याय नाही. सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम आहे. यात पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यांचा वापर होत नसल्याने पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत सुंदर उपक्रम असून, यात व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते. अशा उपक्रमांना माझा कायम पाठिंबा असेल, असे प्रबोधन जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केले. (Coaching from Corona, Anna Hazare gave great advice)

हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने ' अभिवादन सायकल रॅली' आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या १२५०० सायकलस्वारांनी सहभाग घेत तब्बल २५०००० किलोमीटर एवढे अंतर सायकलिंग करत हजारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. हजारे यांचे देशभर कार्यकर्ते व चाहते असल्याने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ही अनोखी भेट मिळाली. 

या वेळी सायकल रॅली पारनेर येथे पोहचल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे स्वागत करत सर्वांना चहा व नाश्त्या दिला. या वेळी पारनेर पोलिसांनी सायकल रॅलीस सहकार्य केले. 

हजारे म्हणाले, की एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना आज देशभरातील सायकलस्वारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे केलेले आयोजन राज्यासाठी व देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून, त्याचे अनेक नैसर्गिक संकटात रूपांतर होत आहे. ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असल्याचे सांगत सर्व सायकलस्वारांचे आभार मानतो.

या 'अभिवादन सायकल रॅली' मध्ये सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, कमल पंत, एकनाथ भालेकर, लाभेष औटी, दादा महादू पठारे, सुनिल हजारे, शामराव पठाडे, विनोद गोळे, शंकर नगरे, उदय शेरकर,  गणेश भापकर, आकाश पठारे,  सुशांतराजे देशमुख, स्वप्निल मापारी, अक्षय जाधव, नाना आवारी, हनुमंत पठारे, भूषण गाजरे, स्वप्निल पठारे, यश पठारे, सुशांत शिंदे आणि प्रणव गाजरे आदी सायकलस्वारांनी सहभाग घेत तब्बल ३७ किमीचा प्रवास करत अण्णांना वाढदिवसाची भेट दिली. यावेळी रॅलीमध्ये 'पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा' अशा घोषणांचा जयघोष संपूर्ण रॅलीमध्ये केला.

सरपंच डॉ. धनंजय पोटे, माजी सरपंच जयसिंग मापारी, डॉ. गणेश पोटे, पंकज तिकोणे, गणेश भोसले, शरद मापारी, डॉ. राहुल पोटे, सदाशिव पठारे आदींनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली.

अण्णांचा तरुणांना सल्ला

वडापाव, मिसळ, पावभाजी, बर्गर, पिज्जा यांसारखे फास्टफूड असलेले पदार्थ शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे ते खाऊ नयेत. त्याऐवजी मोड आलेले कडधान्य, काजू बदाम, दूध असे पदार्थ खावेत. यातून शरीराची झालेली झीज भरून निघते.

 

हेही वाचा...

मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख